वेळ पडल्यास आंदोलन करणार
By Admin | Updated: July 14, 2014 23:33 IST2014-07-14T23:31:46+5:302014-07-14T23:33:26+5:30
अनंत राणे : पदवीधर शिक्षक संघाचा निर्णय

वेळ पडल्यास आंदोलन करणार
कणकवली : शाळा व प्रशासन यांच्यात दुवा साधण्याचे काम केंद्रप्रमुख पद निर्मितीमुळे साध्य झाले आहे. त्यामुळे १० जून २०१४ पूर्वी अभावितपणे भरलेली केंद्रप्रमुख पदे कायमस्वरूपी रहावीत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याबरोबरच वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत राणे यांनी दिली.
ओरोस येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हा शाखेची बैठक नुकतीच झाली. यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. या सभेत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम २०१४ अंतर्गत १० जून २०१४ केंद्रप्रमुखांच्या नेमणुकीच्या पद्धतीबाबतच्या अधिसूचनेबाबत विचार- विनिमय करण्यात आला. या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १९ आॅक्टोबर २०१२ रोजी दिलेल्या केंद्रप्रमुख पदोन्नतीच्या ८९ नेमणुकांवर संभाव्य होणाऱ्या परिणामांबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी पुणे येथे झालेल्या राज्यसंघटनेच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहितीही देण्यात आली. तत्कालिन शैक्षणिक गरज म्हणून अभावितपणे भरलेल्या केंद्रप्रमुखांना त्या पदावर कायम करण्यात यावे, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित मंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव व संचालकांची राज्य संघटनेच्यावतीने भेट घेण्यात आली आहे. माजी जिल्हाध्यक्ष सुरेश पेडणेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भिकाजी तळेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)