पतीचा केला खून, पत्नी व तिच्या प्रियकराला जन्मठेप
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 29, 2022 18:11 IST2022-08-29T18:05:45+5:302022-08-29T18:11:05+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावातील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने गुरव यांचा खून केला होता.

पतीचा केला खून, पत्नी व तिच्या प्रियकराला जन्मठेप
सिंधुदुर्ग : आपल्या प्रियकराच्या मदतीने पती शिक्षक विजयकुमार गुरव यांचा खून केल्याप्रकरणी जयलक्ष्मी गुरव आणि सुरेश चोथे या दोघांनाही प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी जन्मठेप आणि ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची हकीगत अशी ६ ते ७ नोव्हेंबर २०१७ या रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावातील शिक्षक असलेल्या विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी हिने त्यांच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळी आपला प्रियकर सुरेश चोथे याच्या मदतीने पतीचा खून केला होता. या घटनेनंतर विजयकुमार यांचा मृतदेह प्रियकराच्या सहाय्याने कारमधून सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील कावळेसादच्या दरीत फेकला होता. आणि याप्रकरणी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जयलक्ष्मी गुरव आणि सुरेश चोथे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणी २९ साक्षीदार तपासण्यात आले आहे.
याप्रकरणी गुरुवारी (२५ ऑगस्ट रोजी) न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विजकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना विजयकुमार यांच्या खूनप्रकरणी दोषी ठरवत शुक्रवारी (दि.२६) दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून निकाल दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने या प्रकरणावर आज, सोमवारी (दि. २९ ) शिक्षा सुनावली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार यावर आज सुनावणी झाली असता, जयलक्ष्मी गुरव आणि सुरेश चोथे यांना भादवी कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तर, २०१ सह ३४ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १२ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकार वकील ॲड. अजित भणगे यांनी काम पाहिले.
गुरव यांच्या नातेवाइकांकडून निर्णयाचे स्वागत
शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खूनप्रकरणी जयलक्ष्मी गुरव आणि सुरेश चोथे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. नंतर गुरव यांच्या नातेवाइकांनी न्यायालयाबाहेर विजयकुमार गुरव अमर रहे, न्यायदेवतेचा विजय असो नारा देत आनंद व्यक्त केला.