होळीच्या सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार : संजय घोगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:55 IST2021-03-01T19:52:45+5:302021-03-01T19:55:04+5:30
Home Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.

सिंधुदुर्गातील महा आवास अभियानातील घरांची पाहणी संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी केली. यावेळी अन्य अधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.
राज्यात महा आवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्गचे सहायक प्रकल्प अधिकारी जगदीश यादव, अधीक्षक विक्रांत गावडे, सहायक लेखा अधिकारी मनोज पिळणकर, जिल्हा प्रोग्रामर श्रद्धा गिरकर, कनिष्ठ सहायक ऋतुराज तळवणेकर, लिपिक कविता परब, डेटा एन्ट्री ऑपरेटर स्मिता मोजरकर आदी उपस्थित होते.
या दौऱ्यामध्ये त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती, वर्दे-कुडाळ, वेंगुर्ला-मातोंड, सावंतवाडी-इन्सुली येथील ग्रामपंचायत कार्यालये तसेच लाभार्थ्यांच्या घरकुलांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
अभियानातील इतर उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये भर देऊन लाभार्थ्यांना सर्व सुविधांनीयुक्त घरकुलांबरोबरच लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावण्यावर भर देण्याच्या सूचना संजय घोगळे यांनी संबंधितांना दिल्या. तसेच घोगळे यांनी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालिका दीपाली पाटील यांच्याशी अभियानाच्या सकारात्मक प्रगतीबाबत चर्चा केली.