आधी नुकसान भरपाई द्या, कणकवलीतील महामार्ग उड्डाणपूल दुरूस्तीचे काम पाडले बंद
By सुधीर राणे | Updated: December 23, 2022 17:14 IST2022-12-23T17:10:27+5:302022-12-23T17:14:05+5:30
महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे टेंबवाडी येथील एका नागरिकाचा मृत्यू

आधी नुकसान भरपाई द्या, कणकवलीतील महामार्ग उड्डाणपूल दुरूस्तीचे काम पाडले बंद
कणकवली: कणकवली शहरात सुरू करण्यात आलेले महामार्ग उड्डाणपूल दुरूस्तीचे काम भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी बंद पाडले. महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे टेंबवाडी येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना आधी नुकसान भरपाई द्या, नंतरच उड्डाणपूल दुरूस्तीचे काम सुरू करा असे परुळेकर, सावंत यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सुनावले.
शहरातील एस.एम. हायस्कूल या दरम्यान खचलेल्या उड्डाणपूल रस्त्याच्या दुरूस्तीचे काम शुक्रवारी सकाळी ११ पासून सुरू करण्यात आले होते. मात्र नगरसेवक परुळेकर, महेश सावंत, सागर राणे आदींनी तेथे जाऊन काम बंद पाडले. चार महिन्यापूर्वी शहरातील टेंबवाडी येथील एक नागरिक पदपथावरून चालत होते. पदपथालगत असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे शहरातील नागरिकाला प्राण गमवावा लागला.
मृताच्या नातेवाईकांना ठेकेदाराकडून भरपाई मिळायला हवी होती. मात्र ठेकेदाराने भरपाई देण्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आधी नुकसान भरपाई द्या,त्यानंतरच दुरूस्तीचे काम सुरू करा असे परुळेकर आणि सावंत यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सुनावले. सुमारे अर्धा तास महामार्ग ठेकेदार कंपनीचे उदयवीर सिंग तसेच इतर अधिकारी आणि नगरसेवक परुळेकर यांच्यात भरपाईबाबत चर्चा सुरू होती. मात्र भरपाई देण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे जोपर्यंत नुकसान भरपाई दिली जात नाही तोवर उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा परुळेकर यांनी दिला.