अतिवृष्टीने रस्त्यांची दुरवस्था; कोकणासाठी स्वतंत्र निकष लावा, नीलेश राणे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:47 IST2025-12-10T13:47:12+5:302025-12-10T13:47:50+5:30
विदर्भाचे निकष कोकणाला नको

अतिवृष्टीने रस्त्यांची दुरवस्था; कोकणासाठी स्वतंत्र निकष लावा, नीलेश राणे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
नागपूर / मालवण : कोकणात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे कोकणातील रस्ते आणि महामार्गांची झालेली दुरवस्था, याकडे आमदार नीलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. राज्याच्या अन्य भागात पडणारा पाऊस आणि कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता, कोकणाला मराठवाडा विदर्भाचे निकष न लावता कोकणाला स्वतंत्र निकष लावावेत, अशी जोरदार मागणी केली.
नीलेश राणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग यावर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जातो. कोकणात पडणारा प्रचंड पाऊस पाहता, येथे डागडुजीदरम्यान केलेला सर्व खर्चही वाया जातो.
माझ्या मतदारसंघामध्ये चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. आम्ही रस्ते तरी कसे टिकवायचे? मोठ्या प्रमाणामध्ये टूरिस्ट इकडे येतात. मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते. डंपर वाहतूक होते, अशा परिस्थितीत आपण रस्त्याची क्वालिटी जर मेंटेन केली नाही, तर कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला.
जिथे पाऊस चार इंच पडत नाही, त्या ठिकाणचे निकष आपण तेच निकाल जर कोकणाच्या रस्त्यांना आपण लावणार असू, तर ते रस्ते टिकणार नाहीत. दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्ते टिकवता आले नाहीत तर ती चूक आपली असं मला वाटतं, असे ते म्हणाले.
अधिकारी, ठेकेदार ढगांकडे बोट दाखवतोय
यावर्षी कोकणामध्ये जवळपास सहा महिने कोकणामध्ये भरपूर पाऊस होता. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता. सहा महिने कोकणामध्ये पाऊस पडला. तुम्ही विचार करा, त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल. आम्ही ठेकेदारांना जेव्हा विचारतो, त्यांच्याकडे काय उत्तर नाही. आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो, त्यांच्याकडे काय उत्तर नाही. सहा महिने पाऊस पडल्यामुळे अधिकारी, ठेकेदार ढगांकडे बोट दाखवतोय. कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर ते लोक आहेत.
मागची बिलं काढली नाहीत
सार्वजनिक बांधकाम विभागातून म्हणून अजूनपर्यंत नवीन ठेकेदार घ्यावा की न घ्यावा, ठेकेदारांना पडलेला हा प्रश्न आहे. मागचीच बिलं भरली गेली नाहीत. सरकारने दुरुस्तीला पैसे दिले, पाऊस जास्त पडला, परंतु तो खर्च पडला नाही. ठेकेदाराला कारण मिळालं. अधिकाऱ्यांना कारण मिळालं, अशा परिस्थितीमध्ये दुरुस्तीचे पैसे येऊन सुद्धा रस्ते दुरुस्त झालेले नाहीत.
काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे लागेल
महामार्गाचा पण तोच विषय आहे. एमडीआरचे रस्ते असे कधीच खराब झाले नाहीत, तेवढे या पावसाळ्यात खराब झाले. दरवर्षी आपल्याला जर रस्ता बनवावे लागेल, तर तो रस्ता टिकणार कसा? काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे लागेल. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. नाही तर दरवर्षी तोच तोच रस्ता करावा लागेल.
विदर्भाचे निकष कोकणाला नको
यावेळी त्यांनी याला जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली. अशा अधिकारी आणि कंत्राटदारांचा जागच्या जागी बंदोबस्त व्हावा. शासनाने ते लवकरात लवकर करावं आणि कोकणातील रस्ते नीट करावेत. कोकणचे जे निकष आहेत, ते बदलून टाका. विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका, अशी आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.