कणकवली : कणकवली शहरामध्ये गेल्या महिन्यापासून रास्त दराच्या धान्य दुकानांवर धान्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होऊन बसले आहे. या समस्येची तत्काळ दखल घेऊन आमच्या भावना शासनदरबारी पोहोचवाव्यात. तसेच रास्त दराचा धान्यपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आमच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे शहरातील नागरिकांनी तहसीलदारांना दिला आहे.येथील तहसील कार्यालयात मंगळवारी नगरसेवक गौतम खुडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काही नागरिकांनी नायब तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन सादर केले. यावेळी किशोर चौगुले, बिरबल चौगुले, आकाश सकट, रमेश गायकवाड, विष्णू सकट, बाबी कदम, मनोज खुडकर, संतोष कांबळे, समीर कांबळे, योगिता मेस्त्री, प्रिया मेस्त्री, उत्तम तांबे, विजया जाधव यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.शासनाकडून सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नाही. अलीकडे रास्त धान्य दुकानावर धान्यच उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे धान्याविना हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळातदेखील धान्य मिळू शकत नाही. रास्त धान्य दुकानात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेक गोरगरिबांना अद्याप रेशनकार्ड मिळू शकलेली नाहीत. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
रास्त धान्य दुकानावर धान्य मिळणे बंद
By admin | Updated: October 29, 2015 00:12 IST