सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांच्या कळप, नितेश राणे यांच्या ओएसडींनी कॅमेऱ्यात कैद केला; नागरिकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:06 IST2025-07-24T19:06:05+5:302025-07-24T19:06:26+5:30
वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाही

सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांच्या कळप, नितेश राणे यांच्या ओएसडींनी कॅमेऱ्यात कैद केला; नागरिकांमध्ये दहशत
सावंतवाडी: सावंतवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नरेंद्र डोंगर परिसरात स्थिरावलेल्या गव्यांच्या कळपाने मंगळवारी शिरोडा नाका परिसरात आपली हजेरी लावली. दुपारी भरवस्तीत हे गवे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे गवे अगदी पाळीव म्हशी तसेच गायी जशा मुक्तपणे फिरतात तशाच प्रकारे कळपाने फिरत आहेत.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओएसडी आणि सावंतवाडीचे तत्कालीन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा कळप कैद केला आहे. भरवस्तीत गव्यांच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात वावर झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाही
गेले अनेक दिवस या कळपाला नरेंद्र डोंगर परिसर, माठेवाडा, बाहेरचावाडा, माजगाव-मेटवाडा, मळगाव या भागांत फिरताना पाहिले गेले आहे. विशेष म्हणजे, कळप अनेक वेळा रस्ता ओलांडत असल्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे या गव्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, याबाबत सावंतवाडी वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात आलेली नाही.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- शहराच्या परिसरात आणि भरवस्तीत गवे येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे कार्यालय जवळच असून, गव्यांच्या मोठ्या प्रमाणावर वावरावर त्वरित ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात गव्यांच्या कळपाला सागर साळुंखे यांनी कॅमेऱ्यात टिपले आहे.