Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 02:12 PM2020-08-22T14:12:12+5:302020-08-22T14:12:51+5:30

' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

Ganaraya arrives at Sindhudurg in style! | Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी भावपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन झाले.

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

सुधीर राणे

कणकवली : ' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाचे काहीसे सावट यावर्षीच्या गणेशोत्सवावर आहे.

सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच शनिवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.

गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी गुरुवारी तर काही जणांनी शुक्रवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी शनिवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल ,ताशांचा गजर जरी मोठ्या प्रमाणात ऐकू येत नसला तरी फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती.

श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वानी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यन्त सुरु रहाणार आहे.

प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे. यावर्षी कोरोनामुळे गणरायाना कमी दिवस आपल्या घरी ठेवण्याचे नियोजन काही भाविकांनी केले आहे.

 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. प्रशासन ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे.तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे.

अनेक ठिकाणी पुरोहितांच्या अनुपस्थित पूजा !

अनेक घरात दरवर्षी पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश मुर्तीची स्थापना तसेच विधिवत पूजन करण्यात येते. अनेक ठिकाणी पुरोहिताना पुजेसाठी आमंत्रण देण्यात आलेले असल्याने यजमानांच्या घरी पूजनाची वेळ साधण्यासाठी सकाळ पासूनच अनेक पुरोहितांची लगबग सुरु असते.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरोहितांच्या अनुपस्थितीत अनेक ठिकाणी पूजा करण्यात आली. त्यासाठी विविध पूजा अँपची मदत घेण्यात आली.

मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले!

घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर घरात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.

पावसाच्या उघडीपीने दिलासा!

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकाना दिलासा मिळाला. तसेच श्री गणेश मूर्ती घरी आंणताना होणारी तारांबळ टाळता आली. त्यामुळे भाविकानी गणरायाचे आभार मानले.

Web Title: Ganaraya arrives at Sindhudurg in style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.