सिंधुदुर्ग: व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखवत तरुणीला घातला गंडा, एकावर गुन्हा दाखल
By सुधीर राणे | Updated: November 5, 2022 13:47 IST2022-11-05T13:46:36+5:302022-11-05T13:47:06+5:30
१ लाखाची रोख रक्कम असे सुमारे ३ लाख ६० हजार रुपयाला घातला गंडा

सिंधुदुर्ग: व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखवत तरुणीला घातला गंडा, एकावर गुन्हा दाखल
कणकवली: तालुक्यातील कलमठ येथील वीस वर्षीय तरुणीला कणकवलीत सॅनिटरी नॅपकीनचे दुकान चालू करुन त्यात भागीदार बनवतो असे आमिष दाखवत तिच्याकडून २ लाख ६० हजाराचा धनादेश आणि १ लाखाची रोख रक्कम असे सुमारे ३ लाख ६० हजार रुपयाला गंडा घातला. याप्रकरणी अल्फीझा हेल्थ केअर प्रा. लि. या कंपनीचा सीईओ हसन अलीवणू (रा. साटवली, लांजा) याच्याविरुध्द कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना २४ मे ते २ जून २०२२ या कालावधीत घडली.
फसवणूक झालेल्या त्या तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तीने सॅनिटरी नॅपकिनबाबत तिला माहिती दिली होती. त्यातून या कंपनीच्या सीईओशी तीचा संपर्क झाला. दरम्यानच्या कालावधीत संशयित हसन अलीवणू याने तिचा विश्वास संपादन केला. आपल्या कंपनीचे सॅनिटरी नॅपकीनचे दुकान कणकवलीत चालू करायचे आहे. त्यामध्ये भागीदार व्हा. त्यात तुमचा फायदा असल्याचे सांगत आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या वडीलांशी संपर्क साधून काही रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले.
त्यानुसार त्याच्यावर विश्वास ठेवून त्या युवतीने बँकेचा धनादेश आणि रोख स्वरुपात ३ लाख ६० हजाराची रक्कम त्याला दिली. नंतरच्या काळात त्याने आपला भ्रमणध्वनी बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित हसन अलीवणू याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.