चार हायस्पीड ट्रॉलर्स मालवण बंदरातून मुक्त
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:46:58+5:302015-10-29T00:08:11+5:30
४२ लाखांचा दंड भरला : अतिक्रमण झाल्यास समुद्री आंदोलन, मच्छिमारांचा इशारा

चार हायस्पीड ट्रॉलर्स मालवण बंदरातून मुक्त
मालवण : मालवण समुद्र्रात शनिवारी रात्री घडलेल्या आठ तासांच्या थरार संघर्षात मच्छिमारांनी पकडलेल्या कर्नाटकमधील चार हायस्पीड ट्रॉलर्सना ४२ लाख १५ हजार ४५० रुपयाचा दंड तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी ठोठावला होता. यानुसार बुधवारी सकाळी ‘त्या’ ट्रॉलर्स मालकांनी दंडाची रक्कम ‘महसूल’कडे भरणा केली आहे. मालवण बंदरात मत्स्य व पोलीस विभागाच्या ताब्यात असलेल्या चार हायस्पीड ट्रॉलर्स आणि ३६ खलाशांना तहसीलदारांच्या आदेशानुसार सायंकाळी उशिरा मुक्त करण्यात आले.
दरम्यान, मत्स्य विभागाने ट्रॉलर्सवरील मासळीचा पंचनामा केला होता. त्यानुसार दंडाधिकारी यांनी पाचपट दंडाची कारवाई केली. दंडाची रक्कम भरल्याबाबतचे पत्र महसूलकडून प्राप्त झाले असून हायस्पीड ट्रॉलर्स सोडण्याची कार्यवाही केली जाईल, असे परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे यांनी सांगितले.
ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक तोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. सिंधुदुर्गातील या मासेमारी वादावर राज्यस्तरावर चर्चा सुरु आहे. मच्छिमारांच्या जाळ्यांची नुकसान भरपाई शासन स्तरावर देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे दंडाची रक्कम भरणा केल्यानंतर सोडण्यात आलेल्या बोटींना आम्ही अटकाव करणार नसल्याचे तोडणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शासनाला पंधरा दिवसांची ‘डेडलाईन’
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनांचा मान ठेवून सोडण्यात आलेल्या बोटींना रोखणार नाही.
राज्य शासनाने हायस्पीड विरोधी अपेक्षित कार्यवाही न केल्यास पुन्हा समुद्री संघर्षाचा इशारा देण्यात आला.
यापुढे अतिक्रमण केल्यास तीव्र स्वरूपाचा संघर्ष घडेल. यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल, अशी भूमिका घेतली.