सूत्रधार भास्कर जाधवच

By Admin | Updated: October 29, 2015 00:14 IST2015-10-28T23:34:40+5:302015-10-29T00:14:45+5:30

गुहागर पालिका : नगराध्यक्ष निवडीचे राजकारण

Formalist Bhaskar Jadhavch | सूत्रधार भास्कर जाधवच

सूत्रधार भास्कर जाधवच

संकेत गोयथळे--- गुहागर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, आमदार भास्कर जाधव यांचे एकहाती नेतृत्व आहे. महिला आरक्षण असल्याने स्नेहा वरंडे यांची निवड झाल्यानंतर अडीच वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले जाधवांचे कट्टर समर्थक जयदेव मोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करुन नगरपंचायतीची सर्व सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती ठेवली आहेत.
स्नेहा वरंडे यांचा राजकारणातील अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. महिला आरक्षण असल्याने वरंडे यांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले आहे. मात्र, नगराध्यक्ष पदावरुन जयदेव मोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण नसली तरी राजकीय वाटचालीत एखाद्या उच्च पदावरुन खालच्या पदावर काम करणे कमीपणाचे समजले जाते. तरीही खंदे समर्थक असणाऱ्या जयदेव मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली.
निवडीआधी तालुकाध्यक्ष विनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी नगरपंचायत नवीन आहे, प्रशासकीय कामांच्या अडचणी आहेत, विकास आराखडा व्हायचा आहे, अशावेळी नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम पाहिलेल्या जयदेव मोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्याचे पक्ष नेतृत्वाचे आदेश असल्याचे सांगितले. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तालुकाध्यक्ष विनायक मुळे यांनी सांगितले की, दीपक कनगुटकर किंवा अन्य कोणी नगरसेवक या पदासाठी लायक नाही असे नसून सर्वच नगरसेवक योग्य आहेत. तरीसुद्धा हा निर्णय भास्कर जाधव यांनी विचारपूर्वक घेतलेला असून, त्याची अंमलबजावणी करणे आमचे काम आहे. यामध्ये कोणाच्याही कमीपणाचा विषय येत नाही असे स्पष्ट केले.
उपनगराध्यक्षपदासाठी यापूर्वी अनेक वर्षे गुहागर शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दीपक कनगुटकर यांचे नाव आघाडीवर होते. याशिवाय अन्य नगरसेवकही इच्छूक होते. मात्र, याबाबत जाहीरपणे कोणीही वक्तव्य केलेले नाही.
गुहागर मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारल्यानंतर भास्कर जाधव यांनी तत्कालीन युवक अध्यक्ष व शहराध्यक्ष दीपक कनगुटकर यांचे खटकल्याने काही वर्षे कनगुटकर यांनी अलिप्त राहणे पसंत केले होते. यानंतर नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा मनोमिलन होऊन नगरसेवक म्हणून निवडून आले.
जयदेव मोरे यांच्यानंतर अनुभवी म्हणून एकमेव दीपक कनगुटकर यांचे नाव चर्चेत होते. यावेळी उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड होईल असे वाटत असतानाच भास्कर जाधव यांनी कोणताही धोका न पत्करता गटनेता म्हणून असलेले व याआधी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळलेल्या जयदेव मोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करत नगरपंचायतीची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत.


उत्सुकता : धोका पत्करला नाही
गुहागर तालुक्याची ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड लक्षवेधी ठरली. भास्कर जाधव यांच्याकडेच निर्णयाची चावी असल्याने ते या पदांवर कोणाची निवड करणार याबाबत संपूर्ण तालुक्यात उत्सुकता लागून राहिली होती.

प्रश्न मार्गी लावणार
नूतन नगराध्यक्ष स्नेहा वरंडे यांनी आपण नागरिकांचे मुलभूत आणि सार्वजनिक प्रश्नांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Formalist Bhaskar Jadhavch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.