तिलारी घाटात भीषण अपघात, कार दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 00:02 IST2018-07-09T00:01:58+5:302018-07-09T00:02:35+5:30
वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉइंटवर आलेल्या बेळगाव येथील पर्यटकांची व्हॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला.

तिलारी घाटात भीषण अपघात, कार दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉइंटवर आलेल्या बेळगाव येथील पर्यटकांची व्हॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही पर्यटक बेळगाव तालुक्यातील असून, त्यांच्या नातेवाईकांकडून ओळख पटली आहे.
हा अपघात रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून सायंकाळी उशिरा हे पाचही मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिले. मोहन लक्ष्मण रेडेकर (४० रा बाळेकुंद्री), किशन मुकुंद गावडे (१९ रा जुने बेळगाव), यल्लाप्पा एन पाटील (४५ रा बोकानूर), पंकज संपत किलेकर (३० रा शिवाजी नगर, बेळगाव) आणि नागेंद्र सिद्राय बाबूगोडे (२९ आष्ठे) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे आहेत.
हे पाचही जण व्हॅगनर कारने तिलारीनगर येथे आले. दुपारी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे पाचही जण आपली कार घेऊन ते येथील लष्कर पॉईंट पर्यटनस्थळ पाहण्यासाठी निघाले. या पर्यटनस्थळी कार तशीच पुढेपुढे नेत असताना समोर असलेल्या खोल दरीचा अंदाज न आल्याने कार चालकाचा कारावरील ताबासुटुन ही कार थेट साडे चारशे ते पाचशे फूट खोल असलेल्या दरीत कोसळून हा अपघात झाला.