Sindhudurg: मच्छीमारांनी शिकस्त करून डॉल्फिनला दिले जीवदान, कांदळवन विभागाची बघ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:49 IST2025-11-03T16:48:53+5:302025-11-03T16:49:39+5:30
उपचार केंद्र चार वर्षे रखडले

Sindhudurg: मच्छीमारांनी शिकस्त करून डॉल्फिनला दिले जीवदान, कांदळवन विभागाची बघ्याची भूमिका
मालवण : मालवण दांडी समुद्रकिनारी शनिवारी रात्री पट्टेदार डॉल्फिन मच्छीमारांना आढळून आला. या डॉल्फिनला सुरक्षित हालचाली करून मच्छीमारांनी खोल समुद्रात सोडले. यावेळी मच्छीमारांनी कांदळवन कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जलद प्रतिसाद न मिळाल्यामुळे मच्छीमारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
किनाऱ्यावरील मच्छीमारांना समुद्राबाहेर आलेला डॉल्फिन दिसून येताच, त्यांनी तत्काळ मदतीसाठी कांदळवन कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर डॉल्फिनच्या सुटकेसाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. साडेचार फूट लांब असलेल्या या डॉल्फिनला स्थानिक मच्छीमार रश्मीन रोगे, भाई जाधव, अक्षय रेवणकर, भार्गव खराडे, रोहित मालंडकर आदींनी प्रयत्न करून बोटीद्वारे खोल समुद्रात सोडले.
कारभार प्रभारींच्या हाती
कांदळवन कक्षाच्या कारभारावर मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. मालवण येथे कांदळवन विभागाचे कार्यालय असून, या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त असतो. मात्र, मागील काही वर्षे या ठिकाणी पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नाहीत. हा कारभार प्रभारींच्या हातात असून, मच्छीमार समुदायाशी त्यांचा संपर्क दुरावला असल्याचा आरोप यावेळी मच्छीमारांनी केला.
उपचार केंद्र चार वर्षे रखडले
मालवण बंदर हे सागरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक दुर्मीळ सागरी प्रजाती अनेकदा अत्यवस्थ स्थितीत आढळून येतात. या प्रजातींसाठी तळाशील येथे उपचार केंद्र प्रस्तावित आहे. मात्र, गेली अनेक वर्षे या उपचार केंद्राचे काम रेंगाळले असून, शासनाने येथील सागरी जैवविविधता राम भरोसे सोडली असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.