मच्छिमार बोटी बहुतांश काळ किनारीच
By Admin | Updated: May 25, 2016 00:20 IST2016-05-24T23:45:50+5:302016-05-25T00:20:57+5:30
मच्छिमार अडचणीत : वेंगुर्ले बंदरातील अवस्था, पर्यायी व्यवस्थेसाठी शासनमान्यतेची गरज

मच्छिमार बोटी बहुतांश काळ किनारीच
प्रथमेश गुरव -- वेंगुर्ले --जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्सनेटधारकांचा होणारा अतिरेक, समुद्र किनाऱ्यावरील धडकी भरवणारे आवाज आणि मुळातच समुद्रात कमी झालेली मासळी यामुळे चालुवर्षी मासेमारी करणाऱ्या बोटी बहुतांशी काळ किनाऱ्यावरच राहिल्या. आता पावसाळा तोंडावर आल्याने ट्रॉलर्स सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने या बोटी किनाऱ्यावर आणल्या जात आहेत. यामुळे वेंगुर्ले किनाऱ्यावर बोटींची गर्दी होत आहे. गेली वर्षभर पर्सनेटधारक बोटींनी वेंगुर्ले समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत येथील मासळी ओढून नेली होती. त्यामुळे येथील स्थानिक मच्छीमारांना उपाशीपोटी रहावे लागले. तर गत काही दिवसांमध्ये किनारपट्टीवर होणाऱ्या भुकंपसदृश आवाजांनी किनारपट्टीसह मच्छिमार हादरून गेले होते. त्यामुळेही बोटी किनाऱ्यावर आणून मच्छीमारीला सक्तीची विश्रांती देण्यात आली होती. यामुळे मासेमारी बंद झाली होती.
मासेमारी बंद झाल्यानंतर येथील मच्छिमारांना अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. मच्छिमारांना अन्य कोणताही पर्यायी रोजगार नसल्याने मासेमारी बंदीच्या कालावधीत मागील मिळविलेल्या उत्पादनावरच गुजराण करावी लागते. १ जूनला अद्याप दहा दिवस राहिले असले, तरी पावसाच्या अनियमिततेमुळे मच्छिमारांनी आपले ट्रॉलर्स किनारी आणले आहेत. पावसाच्या पाण्याने भिजून ट्रॉलर्सचे नुकसान होऊ नये, यासाठी माडाची झापे व प्लास्टिकच्या सहाय्याने किनाऱ्यावर सुरक्षित ठेवण्यास सुरूवात केली आहे.
वेंगुर्ले किनाऱ्यावर मोठ्या ट्रॉलर्सधारकांनी गेल्या आठवड्यापासून ट्रॉलर्स पावसापासून सुरक्षित ठेवण्याच्या कामाला सुरूवात केली असून, बहुतांशी ट्रॉलर्स किनाऱ्यावर माडाच्या झापांनी बंदिस्त केल्या आहेत. पण काही मच्छीमार दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील पारंपरिक मासेमारी सुरू करतात. अशा मासेमारीतून मिळालेले मासे गरजेपुरते आपल्यासाठी ठेवून राहिलेल्या माशांची विक्री करतो. त्यामुळे बंदी कालावधीत दृष्टीआड होणारे मासे खाडीतील मासेमारीमुळे लोकांच्या जेवणासाठी मिळतात. शिवाय मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात नसला, तरी गरजेपुरता रोजगार मिळतो.
वर्षभरात पर्सनेटधारकांचे अतिक्रमण, समुद्रात होणारे आवाज आणि मुळात समुद्रातील घटलेली मच्छी यामुळे वेंगुर्ले किनाऱ्यावरील मच्छिमारांना चालू वर्ष तसे कडकीचेच गेले. त्यामुळे या ना त्या कारणाने वेंगुर्ले बंदरातील मच्छीमारी करणाऱ्या बोटी तशा वर्षभर किनारीच राहिल्या.
मासळीत घट : परकियांचे अतिक्रमण
सिंधुदुर्गातील किनारपट्टीवर इतर ठिकाणापेक्षा मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच माशांच्या विविध जाती मिळत असल्याने गोवा, कर्नाटक, गुजरात, रत्नागिरी आदी ठिकाणचे मच्छीमार येथे येऊन मासेमारी करतात. अशा अतिरेकी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात दिवसेंदिवसे घट होत असल्याने येथील मच्छिमारांची अवस्था बिकट आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत शासनाने मासेमारी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १५ जून ते १५ आॅगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी होता. मात्र, गेल्या वर्षीपासून शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदचा निर्णय घेतल्याने दरवर्षीपेक्षा काही दिवस अगोदर मासेमारी सुरू होणार असल्याने मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. या कालावधीत मासळीची बीज निर्मिती सुरू असते. तसेच वादळी हवामानामुळे होणारी जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे शासन मासेमारी बंदी लागू करते.
वर्षभर मासेमारी थांबल्याने मच्छीमारांची वर्षभराची गुजराण अवघड आहे. जर शासनाने मच्छिमारांच्या बोटींग लायसन्स, निवास न्याहारीबाबत लागणाऱ्या प्रक्रियेत काही प्रमाणात सवलत दिल्यास येथील मच्छीमारही निवास न्याहारीचा पर्यायी व्यवसाय निवडून उदरनिर्वाह करू शकतात.