Fasting back on the third day, courtesy of Nitesh Rane | उपोषण तिसऱ्या दिवशी मागे, नीतेश राणेंची शिष्टाई
उपोषण तिसऱ्या दिवशी मागे, नीतेश राणेंची शिष्टाई

ठळक मुद्देउपोषण तिसऱ्या दिवशी मागे, नीतेश राणेंची शिष्टाईआर्थिक गैरव्यवहारप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

मालवण : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजप गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेतले. आमदार नीतेश राणे यांनी यशस्वी शिष्टाई करताना पालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडू तसेच हिवाळी अधिवेशनातही यावर आवाज उठवून उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, आमदार राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी कुशे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांना शीतपेय भरवले. त्यानंतर कुशेंनी बेमुदत उपोषण मागे घेतले. यावेळी राणे यांनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला.

मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ठेकेदाराकडून पैसे उकळवित आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप मालवणचे नगरसेवक गणेश कुशे यांनी करत ४ डिसेंबरपासून मालवण नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत कुशे यांनी नगराध्यक्षांची प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कुशे यांनी सुरू केलेल्या या उपोषणातील दखल प्रशासनाने घेतली नाही उलट जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्याकडे येत नाही असे सांगत हात झटकले होते.

तीन दिवस उपोषण सुरू असल्याने कुशे यांची प्रकृती ढासळली होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे, प्रमोद करलकर, संतोष गावकर, धोंडी चिंदरकर, रविकिरण तोरसकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.

कुशे यांनी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी राणे यांनी मालवण नगरपालिकेचा कारभार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत होता. मात्र शिवसेनेचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यानंतर भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर येऊ लागले आहेत. हे सर्व पुरावे जनतेसमोर असताना त्याची दखल न घेणे म्हणजे मतदारांना फसवण्यासारखे आहे, असे सांगितले.

कारवाई करण्यास भाग पाडू

नगराध्यक्षांवर कारवाई व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. नगराध्यक्षांनी पदाच्या केलेल्या गैरवापराबाबत स्थानिक आमदार नाईक हे हस्तक्षेप करत असून या प्रकरणात सर्वच लोकांचे साटेलोटे असल्याचा आरोप राणेंनी केला. या संपूर्ण प्रकरणात माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या सहकार्यातून प्रकरण तडीस नेण्यात येईल. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यास भाग पाडू, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

Web Title: Fasting back on the third day, courtesy of Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.