सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकार प्रशांत मेस्त्री काळाच्या पडद्याआड, 'स्त्री'च्या भूमिका केल्या होत्या अजरामर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:17 IST2025-08-02T19:15:15+5:302025-08-02T19:17:00+5:30
विजेचा शॉक लागून पडले होते बेशुद्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकार प्रशांत मेस्त्री काळाच्या पडद्याआड, 'स्त्री'च्या भूमिका केल्या होत्या अजरामर
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दशावतारी कलावंत व कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द - सुतारवाडी येथील प्रशांत रामचंद्र मेस्त्री (५०) यांचे शुक्रवारी निधन झाले. दशावतारामध्ये त्यांनी अनेक स्त्री भूमिका अजरामर केल्या होत्या.
शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हरकुळ खुर्द - सुतारवाडी येथील घरी गाडी वॉशिंग करायची इलेक्ट्रिक मशीन वायर लावून प्रशांत मेस्त्री हे तपासत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्याबाबत माहिती समजताच शैलेश चंद्रकांत मेस्त्री व अन्य ग्रामस्थांनी त्यांना तातडीने कणकवली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
प्रशांत मेस्त्री यांच्या निधनामुळे दशावतारातील एक अभिनयसंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेक ज्येष्ठ दशावतार कलावंतांनी व्यक्त केली. प्रशांत मेस्त्री यांच्या द्रौपदी, कुंती, देवयानी, तारा, पार्वती अशा अनेक स्त्री भूमिका गाजल्या होत्या. लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या मान्सून महोत्सवात द्रौपदी वस्त्रहरणमधील त्यांचा ३५ साड्या नेसण्याचा अभिनय अजरामर झाला होता.