हत्ती प्रशिक्षण मोहीम जानेवारीत
By Admin | Updated: December 26, 2014 23:47 IST2014-12-26T23:13:23+5:302014-12-26T23:47:16+5:30
विनायक राऊत : कुडाळ येथील आढावा बैठकीत माहिती

हत्ती प्रशिक्षण मोहीम जानेवारीत
कुडाळ : जिल्ह्यातील हत्ती पकडून त्यांना प्रशिक्षित करण्याच्या मोहिमेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही ऐतिहासिक मोहीम प्रशासनाने १०० टक्के यशस्वीपणे राबवावी, असे आदेश राज्यातील व जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार विनायक राऊत यांनी दिले. या मोहिमेची पूर्वतयारी झाली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहीम सुरू होईल, असेही यावेळी राऊत यांनी कुडाळ येथील आढावा बैठकीत सांगितले.
कुडाळ-माणगाव येथील आंबेरी येथे सुरू होणाऱ्या या हत्ती पकड मोहिमेची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, या संदर्भात सावंतवाडी विभागाचे उपवनसंरक्षक एस. रमेश कुमार यांनी कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात या मोहिमेची आढावा बैठक आज, शुक्रवारी सकाळी आयोजित केली होती. या बैठकीला खासदार राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक,
कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, कोल्हापूर उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नागपूरचे विभागीय अधिकारी जी. के. वसिष्ठ, सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, सहायक वनसंरक्षक एस. बी. बागडी, कोल्हापूरचे सहायक वनसंरक्षक एस. व्ही. काटकर, तहसीलदार जयराज देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, वनक्षेत्रपाल एस. पी. कदम, कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील होती.
पाच प्रशिक्षित हत्ती आणणार
या ठिकाणी तीन हत्ती असून, त्यात एक मोठी मादी आहे. मादी हत्तीला तिलारी बॅक वॉटर या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. अन्य दोन हत्तींना आंबेरी येथे प्रशिक्षित दिले जाईल. तसेच कर्नाटकातून पाच माहूत, त्यांचे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस एकत्र येणार आहेत.
- विनायक राऊत, खासदार
या ठिकाणी कर्नाटकातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माणगाव खोऱ्यातील तीन हत्तींना पकडण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी पाच कुणकी हत्ती आणले जाणार आहेत. हे कुणकी हत्ती जंगलातील हत्तींना माणसाळायचे काम करतात.
- एस. रमेशकुमार, वनसंरक्षक