'Eat Street for Kids' in Kankavali on 5th November! | कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !
कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !

ठळक मुद्देकणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !समीर नलावडे यांची माहिती ; सहभागाचे आवाहन

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत अनेक कला रसिक आहेत. या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, लहान मुलांसाठी काही तरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम असावा , त्यांना थोडा वेळ तरी विरंगुळा मिळावा यासाठी ' लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ' या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे करण्यात आले आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित मुसळे, विराज भोसले, संदीप नलावडे , पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.

समीर नलावडे म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होईल . तर सायंकाळी ६.०० वाजता मुंबई , गोवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांसमवेत नवीन जुन्या हिंदी, मराठी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफिल यावेळी होणार आहे. सारेगमप फेम कलाकार या मैफिलीत सहभागी होणार आहेत.

या सोबत लहान मुलांसाठी विविध फनी गेम्सची रेलचेलही असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रम स्थळी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावू इच्छिणाऱ्यांना मोफत संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे या खाऊ गल्लीत पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

एक दिवस बच्चे कंपनीसाठी !

लहान मुलांनी आपल्या पालकांसमवेत या खाऊ गल्लीत यावे आणि मौज मजा करावी. आनंद लुटावा अशी या कार्यक्रम आयोजना मागची माझी भूमिका आहे. त्या भूमिकेला मित्र मंडळींनी पाठींबा दिला असून त्यातूनच
एक दिवस बच्चे कंपनीसाठी अशी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना त्यामध्ये सहभागी करावे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: 'Eat Street for Kids' in Kankavali on 5th November!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.