साकाविरहित आंब्याचे स्वप्न साकार
By Admin | Updated: March 20, 2015 23:16 IST2015-03-20T23:11:23+5:302015-03-20T23:16:02+5:30
चाचणी यशस्वी : निर्यातीमधील आणखी एक अडथळा दूर

साकाविरहित आंब्याचे स्वप्न साकार
रत्नागिरी : हापूस आंब्यातील साका ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा-काजू मंडळातर्फे घेण्यात आलेली अर्का साका निवारक प्रक्षेत्र चाचणी यशस्वी झाली आहे. फळे काढणीपूर्व फ्रूट डिपरचा वापर करून औषधामध्ये देठासह बुडवून ठेवली, तर साका होत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी योजनेतून आंबा-काजू मंडळातर्फे शेतकऱ्यांना औषध व फ्रूट डिपर सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आंबा हे भारतातील नगदी पीक असून, राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. मात्र आंब्यातील साका (साकळलेला पांढरा भाग) या दोषामुळे आंबा निर्यातीला मर्यादा येतात. निर्यातीत हा आंबा नाकारला जातो. या समस्येबाबत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हार्टिकल्चर रिसर्च, बंगलोर या संस्थेने संशोधन करून आंब्यातील साका समस्येचे निवारण केले आहे. याबाबत डॉ. रवींद्र यांनी २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने आंबा बागायतदारांच्या शेतावर प्रयोग यशस्वी केला आहे.
साका नियंत्रणाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचण्याच्या दृष्टीने व निर्यातक्षम उत्पादनाची खात्री मिळण्याच्या दृष्टीने प्रयोगाच्या प्रक्षेत्र चाचण्यांची नितांत आवश्यकता असल्याने अर्का साका निवारकांच्या प्रक्षेत्र चाचण्या घेण्याबाबत प्रस्ताव महाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सादर केला होता.आंब्यामध्ये साका होऊ नये यासाठी आंब्यामध्ये बाठ तयार झाल्यानंतर व काढणीपूर्व १५ दिवस आधी आंबा फळे आय.आय.एच.आर. बंगलोर यांनी विकसित केलेल्या औषधामध्ये देठासह बुडवावी लागतात. त्यासाठी फ्रूट डिपरचा वापर केला जातो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निवड केलेल्या आंबा उत्पादकांना औषध व फ्रूट डिपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंबा काजू मंडळ, कृषी विभाग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना प्रशिक्षण
जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० बागायतदारांची निवड केली आहे. यांना दि. २४ व २५ मार्चला वेंगुर्ला येथील कार्यशाळेत आय. आय. एच. आर. बंगलोरचे संशोधक डॉ. रवींद्र हे प्रात्यक्षिकाबाबत माहिती देणार आहेत.