Sindhudurg: चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी'मधून मदत देणार - नितेश राणे
By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 16:45 IST2025-04-21T16:44:28+5:302025-04-21T16:45:16+5:30
विमानतळाच्या विकासासाठी अधिकाऱ्यांबरोबर बैठक

Sindhudurg: चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी'मधून मदत देणार - नितेश राणे
कणकवली: चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देत विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असून त्याचा मनस्ताप जिल्हावासियांना व पर्यटकांना सहन करावा लागतो. ही विमानसेवा निरंतर सुरू रहावी तसेच ही विमानसेवा देणाऱ्या फ्लाय ९१ कंपनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई येथील आपल्या मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीला फ्लाय ९१ कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस, एअरपोर्टचे मुख्य व्यवस्थापक कुलदीप सिंग, सिंधुदुर्ग एअरपोर्ट हेड कॅप्टन जय सदाना उपस्थित होते.
विमानवाहतूक मंत्र्यांची भेट घेणार
बैठकीत पालकमंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना मुंबई सेवा कुठल्याही स्थितीत अडथळे न येता सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच योग्य त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आश्वासित करत प्रसंगी विमानवाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.
..तर पर्यटन वाढीस चालना
तसेच चीपी विमानतळाचा परिसर सुशोभित करण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा नियोजन मधून हातभार लावला जाईल असे सांगितले. चिपी विमानतळावरून अन्य मार्गावर वाहतूक करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्या तर पर्यटन वाढीस चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.