..तर संघटना बांधूच नका
By Admin | Updated: November 6, 2014 22:05 IST2014-11-06T21:59:21+5:302014-11-06T22:05:49+5:30
काँग्रेसची बैठक : नीतेश राणेंच्या कानपिचक्या

..तर संघटना बांधूच नका
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात काँॅग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेल्या आमदार नीतेश राणे यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच यापुढे संघटना बांधताना मागच्या चुका करायच्या असतील तर संघटना बांधूच नका, असेही सुनावले. तसेच काही पदाधिकाऱ्यांनी भाजपाला केलेली मदत त्यांच्या तोंडावर बोलून दाखवल्याने त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला.
सावंतवाडी तालुक्यात काँग्रेसचा झालेला मानहानीकारक पराभव तसेच काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर गेल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या युवा नेत्यांनी बुधवारच्या अनौपचारीक बैठकीत चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस संघटना बळकट करायची असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पक्षात गद्दारांना स्थान देऊ नका, आमच्याकडे चिठ्ठ्या पाठविण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या पातळीवर कारवाई करा, असे मतही त्यांनी मांडले.
ज्यांनी पक्षात राहून गद्दारी केली, भाजपला मदत केली. त्यांना पुढील काळात संघटनेत घेऊच नका. ते काँग्रेसमध्ये थांबून भाजपचे काम करणार असतील तर त्यांची गरज नाही. आतापासून संघटना बांधा मात्र, त्यात कोणत्याही गद्दाराला घेऊ नका, अन्यथा त्या संघटनेचा कोणताच फायदा होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन डोस
भाजपला ज्यांनी मदत केली त्यातील काही पदाधिकारी उपस्थित असल्याचे आमदार नीतेश राणे यांच्या लक्षात येताच त्यांची नावे घेत त्यांना मते कमी कशी झाली, यावरुन विचारणा करत डोस देताच ते पदाधिकारी बैठकीला न थांबताच त्यांनी बाहेर जाण्याचे पसंत
केले. (प्रतिनिधी)
नेत्यांच्या कामाबाबत नाराजी
ऐन निवडणुकीच्या काळात सावंतवाडी पोलिसांसमोर मायनिंग कॉन्ट्रॅक्टर व काँग्रेस नेते यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याबाबत आमदार राणे यांनी नेत्यांना फटकारल्याची चर्चा आहे. तो विषय तेव्हा न काढता नंतर काढला असता तर त्या भागातील मते कमी झाली नसती, असेही सांगितले. यापुढे प्रत्येक गोष्ट सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला.