Sindhudurg: गेळे कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवरून वातावरण तापले, मंत्री केसरकरांना गावबंदीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:11 IST2024-07-29T14:10:14+5:302024-07-29T14:11:19+5:30
जमीन आमच्या हक्काची : केसरकर यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद

Sindhudurg: गेळे कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवरून वातावरण तापले, मंत्री केसरकरांना गावबंदीचा इशारा
सावंतवाडी : गेळे येथील कावळेसाद पॉइंटवरील जागेवरून आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक बनले असून, आमची हक्काची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. मंत्री दीपक केसरकर यांनी ही जागा शासन विकसित करणार असे म्हणून ग्रामस्थांचा अपमान केला आहे. त्यांच्याशी आता कधीच चर्चा नाही उलट ही जागा आम्हाला मिळाली नाही तर केसरकरांना गावबंदी करू, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेळे येथील जमीन प्रश्नावरून मंत्री केसरकर यांनी शनिवारी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी गेळे गावात उमटले. तसेच त्याच्या विधानाचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी सरपंच सागर ढोकरे, नारायण गवस, मनोहर बंड, महादेव पवार, तातोबा गवस, विजय गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेळे ग्रामस्थ म्हणाले, कावळेसाद पॉइंटनजीक असलेला १९ व २० सर्व्हे नंबरमध्ये तब्बल २३ हेक्टर जमीन आहे. मात्र या जमिनीचे गावाने एकत्रित येऊन १९९६ मध्ये वाटप केले आहे. त्यामुळे आता नव्याने वाटप करण्याची गरज नाही फक्त ज्याच्या नावावर या सर्व्हेमधील जमिनी आहेत त्याना सात- बारा देण्यात यावा या जमिनीवर शासनाचे कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे चुकीचा गैरसमज करून देऊ नये, अशी समज ग्रामस्थांनी दिली. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेल्या आंदोलन त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते.
मात्र त्यांना साधी असून, ही विचारपूस सुद्धा केली नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही आणि आम्ही सर्व गाव म्हणून एक आहोत. त्यामुळे काही झाले तरी आम्ही आमच्या जमिनी आमच्याच ताब्यात ठेवणार आहोत. केसरकर यांनी शासनस्तरावर गावाच्या मागे न राहाता ते आपल्याला हवे तसेच करू लागले तर त्यांना गावबंदी करूच, प्रसंगी आम्ही कावळेसाद पॉईंट पर्यटनासाठी बंद करू, असा इशारा ही ग्रामस्थांनी दिला.
या ठिकाणी पर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे केसरकर सांगतात. मात्र, कावळेसाद नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. त्याठिकाणी दिवसाकाठी हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे वेगळ्या पर्यटन प्रकल्पाची गरज काय? आणि तसा प्रकल्प गावाला हवा असल्यास गाव प्रकल्प राबवेल तुम्ही त्यात पडू नका गावातील मुलांनी आयुष्यभर दुसऱ्याकडे मोलमजुरी करावी का? असेच केसरकर यांना वाटत असेल तर चुकीचे आहे.आम्ही स्वत: रोजगार उभारू पण या जमिनीवर केसरकर काय कुणालाच पर्यटन प्रकल्प उभारू देणार नाही, असे ही ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले.
केसरकर यांच्या वक्तव्याचा गावाच्या वतीने निषेध
गेळे गावातील लोक आपल्याकडे कामाला येत होते असे वक्तव्य केसरकर यांनी केले होते. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ती जुनी गोष्ट आहे. ती पुन्हा उगळण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही तुमच्याकडे कायम हमाली करायची का? असा सवाल करून आम्ही केसरकर यांच्या त्या वक्तव्याचा ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला. तसेच केसरकर याच्या सिनेमा गृहाचे काम गेळे ग्रामस्थांनी केले हे आम्हाला माहीत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.