चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोतवाल बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:52 IST2025-09-23T18:51:25+5:302025-09-23T18:52:18+5:30

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू

Demanding fourth class status, Kotwals in Sindhudurg district on indefinite strike | चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोतवाल बेमुदत संपावर

चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोतवाल बेमुदत संपावर

ओरोस : महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने १२ सप्टेंबरपासून नागपूर येथे बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने सक्रिय पाठिंबा दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कोतवाल यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा राज्य सरकारने द्यावा, या मागणीसाठी महसूल सेवक संघटना नागपूर यांनी १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनाकडे महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेली कित्येक वर्षे करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

यामुळे महसूल सेवक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रलंबित असलेल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महसूल सेवक काम बंद आंदोलन करून नागपूर येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी शासनाने याबाबत वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मिटवावकर, उपाध्यक्ष अर्चना दळवी यांच्यासह संतोष नाईक, दीपक आरेकर, सुरेंद्र पेडणेकर, लिया लब्धे, विश्वनाथ गुरव, योगेश वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

काम बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५०० महसूल सेवक सोमवारपासून आंदोलनात सहभागी झाल्याने तलाठी कार्यालयातील कामकाजावर परिणाम होणार आहे. शासकीय दवंडी देणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, महसूल गोळा करणे, टपाल वाटणे, नोटिसा बजावणे, पीक पाहणी, तलाठी दफ्तर ने-आण करणे यांसह विविध कामांवर परिणाम होणार आहे. सध्या महसूल पंधरवडा सुरू असून, या कामावरही परिणाम होणार आहे.

Web Title: Demanding fourth class status, Kotwals in Sindhudurg district on indefinite strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.