“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:42 IST2021-10-25T15:40:58+5:302021-10-25T15:42:46+5:30
एका व्यक्तीवरून शिवसेनेच्या मराठी भूमिकेविषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे.

“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला
सिंधुदुर्ग: सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबायचे नाव घेत नाहीत. यातच मुंबई ड्रग्ज केसप्रकरणातही या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांना मिळालेले पद जर मला मिळाले असते तर आपण कोकणचा कायापालट केला असता, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची भूमिका मराठी माणसाविरोधात आहे, अशी कोणी टीका करू नये. आम्हाला त्या मराठी अधिकाऱ्याबद्दल आदर आहे. त्या अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, उगाचच एका व्यक्तीवरून शिवसेनेच्या मराठी भूमिकेविषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे.
गुजरातहून येणारे ड्रग्स रॅकेट आधी उद्ध्वस्त करा
देशातून ड्रग्ज हद्दपार करणे ही शिवसेनेची भूमिका आहे. ५०-१०० ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभे करायचे. त्यांना या प्रकरणात अडकावयचे, असे सुरु आहे. त्यानंतर ते जामीनावर सुटतात, पुढे काहीच होताना दिसत नाही. ड्रग्ज या देशातून हद्दपार होण्यासाठी गुजरातहून येणारे ड्रग्स रॅकेट आधी उद्ध्वस्त करा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
नारायण राणेंनी कोकणचा विकास करावा, ते त्यांच्या हातात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेले मंत्रिपद हे केंद्रातील मोठे मंत्रिपद आहे. त्याचा उपयोग त्यांनी कोकणसाठी आणि कोकणी जनतेसाठी करावा. हे पद जर मला मिळाले असते तर आपण कोकणचा कायापालट केला असता. नारायण राणेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जे मंत्रिपद मिळवले आहे. त्याच्या माध्यमातून कोकणचा काया पालट करावा. ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर विकास केला तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक करू, असा टोला दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना लगावला. ते टीव्ही९शी बोलत होते.