शहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:44 IST2021-03-25T16:41:34+5:302021-03-25T16:44:26+5:30
KankavliNews Sindhudurg- कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

शहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय
कणकवली : कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाईन सभेमध्ये कणकवली शहर विकास आराखड्यामधील आरक्षण व नवीन रस्ते विकसित करण्याकरिता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली अन्वये हस्तांतरणीय हक्क नगर पंचायत क्षेत्रासाठी लागू करण्याबाबतचा निर्णय प्रामुख्याने घेण्यात आला.
या सभेला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, माही परुळेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, विराज भोसले, अबिद नाईक आदी उपस्थित होते.गार्बेज डेपो येथे ओल्या व सुक्या कचऱ्यावरील प्रक्रियेबाबत अनुषंगिक कामे करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्यामुळे तेथील सर्व्हे नंबर ७९ अ-१४ ही जमीन मालकाकडून वाटाघाटीने खरेदी करण्याबाबतची चर्चाही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर तेथील ६७ गुंठे जागा गार्बेज डेपोच्या विकासासाठी घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
कणकवली शहरातील नवीन बांधकाम मुदतवाढीसाठी शासकीय शुल्क आकारणी संदर्भात चर्चा करण्यात आली. शहरात बांधकामासाठी परवानगी घेऊन एक वर्षानंतरही संबंधित जागेवर बांधकाम झालेले नाही, अशा जागांचा शोध घेऊन संबंधितांना मुदतवाढ देऊन इमारतींसाठी एक हजार रुपये आणि घरांसाठी पाचशे रुपये शुल्क आकारणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्याचबरोबर सीटी को-ऑर्डिनेटर मुदतवाढ देण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली.
यावेळी टेंबवाडी रस्ता, सुकी बिल्डिंग रस्ता करण्याची मागणी नगरसेविका कविता राणे यांनी केली. शिवाजीनगर येथील पथदीपांचे काम करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष नलावडे यांनी शिवाजीनगर पथदीपाला मंजुरी मिळाली असून, निधी उपलब्ध होताच तत्काळ काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
शहर विकासाच्या विविध विषयांवर चर्चा
शहरातील मसुरकर किनई रस्ता पूर्ण करून त्याचे आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण केल्याबद्दल नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला नगरसेवक संजय कामतेकर यांनी अनुमोदन दिले. शहर विकासाच्या विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली.