भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 13, 2022 13:03 IST2022-09-13T12:33:08+5:302022-09-13T13:03:29+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती

भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर गड नदीकिनारी वागदे येथे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांनी दहा लाख रुपयांची रोख स्वरूपात आर्थिक मदत आज, मंगळवारी केली. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी प्रशांत सावंत यांची पत्नी सुचिता सावंत व मुलगा प्रथमेश सावंत यांचेकडे ही रोख रक्कम देण्यात आली. या आर्थिक मदतीबद्दल सावंत यांची पत्नी सुचिता सावंत व मुलगा प्रथमेश यांनी आमदार राणे यांचे आभार मानले.
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या ताब्यातील क्रूजर गाडीला ट्रेलरने धडक देऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रशांत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले होते. त्यानुसार दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आज देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश परब, वकील प्रसन्ना सावंत, नरडवे उपसरपंच सुरेश ढवळ आदी उपस्थित होते.
दि.२६ ऑगस्ट रोजी गडनदी नजीक वागदे येथे भीषण अपघात झाला होता. ट्रेलरने सावंत यांच्या ताब्यातील क्रुझरला धडक दिली होती. त्यानंतर महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. आंदोलनही झाले होते. त्यानंतर दुसरी लेन तातडीने सुरू करण्यात आली. मात्र या अपघातात नाहक बळी गेलेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीने आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती.