गप्पी मासे पैदास केंद्राची दुरवस्था
By Admin | Updated: July 1, 2014 23:57 IST2014-07-01T23:56:06+5:302014-07-01T23:57:36+5:30
जिल्हा परिषद हिवताप विभागाचा कारभार

गप्पी मासे पैदास केंद्राची दुरवस्था
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग प्रतिरोध जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला डासांची उत्पत्ती रोखण्याच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करणाऱ्या दोन्ही विभागाच्या कार्यालयासमोरील ‘गप्पी मासे पैदास केंद्र’ हे डास उत्पत्ती केंद्र बनले आहे. याकडे या विभागांचा दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जातात. जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग प्रतिरोध जनजागरण मोहीम राबविली जाते. या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तळी व डबकी किंवा अन्य पाण्याचे साठे या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून रॉकेल किंवा आॅईल साचलेल्या पाण्यावर टाका, घरातील पाण्याचे साठे सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू नये, सर्व पाणी साठे आठवड्यातून एक दिवस रिकामी करून हे पाणी साठवणुकीची भांडी घासून पुसून कोरडी करूनच पुन्हा वापरावयास घ्या, साचून राहिलेल्या डबक्यात गप्पी मासे सोडा, आपल्या घराच्या परिसरामध्ये वापरात नसलेल्या सिमेंट हौदामध्ये तळ्यामध्ये गप्पी माशांची जोपासना करा, घरातील फुटके डबे, टायर्स, रिकाम्या बाटल्या, मडकी आदी टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका अशा अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन हिवताप विभागामार्फत केले जाते. मात्र ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे हिवताप विभागाचा कारभार सुरु आहे. जिल्हा हिवताप विभागाशेजारीच असलेल्या गप्पी मासे पैदास केंद्राच्या टाकीमध्ये प्लॅस्टिकसह विविध प्रकारच्या बाटल्या, करवंट्यांचा खच पडला आहे. हे गप्पी मासे पैदास केंद्र असले तरी ते प्रत्यक्षात डास उत्पत्ती केंद्र बनले आहे. कित्येक वर्षे हे गप्पी मासे पैदास केंद्र बंद अवस्थेत असल्याने त्याचा वापर होत नसल्याने हे कचराकुंडीच बनले आहे. १० ते १२ फूट खोली आणि १० फूट व्यासाच्या या टाकीमध्ये गप्पी मासे आहेत कुठे? ते शोधावे लागत आहेत. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कर्मचारी वसाहतीसह प्राधीकरणात मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव झाला आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याच्याही टाक्या उघड्या आहेत. ठिकठिकाणी प्लॅस्टिक कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्येही पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते. मात्र त्याकडे या विभागाकडून दुर्लक्षच केला जात आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गप्पी मासे पैदास केंद्राच्या टाकीमध्येही मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊ शकते. पावसाळ्यात याठिकाणी मोठा पाण्याचा साठा होतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी या टाकीला मार्ग नाही. मात्र जिल्ह्यातील डास उत्पत्ती रोखण्यासाठी टाक्या, करवंट्या, बाटल्या शोधण्यापूर्वी कार्यालयानजीक असलेल्या डास उत्पत्ती केंद्रातून (गप्पी मासे पैदास केंद्र) पैदास होणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्याची गरज आहे. तरच हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार रोखण्यास मदत होऊ शकेल. (प्रतिनिधी)