Dallas on mobiles in Vaibhavwadi | वैभववाडीत अज्ञात चोरट्याने भरदुपारी मारला मोबाईलवर डल्ला
वैभववाडीत अज्ञात चोरट्याने भरदुपारी मारला मोबाईलवर डल्ला

ठळक मुद्देवैभववाडीत अज्ञात चोरट्याने भरदुपारी मारला मोबाईलवर डल्ला घटनेनंतर पोलिसांनी लावला शहरात होमगार्ड्सचा पहारा

वैभववाडी : शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील माईणकरवाडी येथे घरात झोपलेल्या विद्यार्थिनींच्या मोबाईलवर अज्ञात चोरट्याने भरदुपारी डल्ला मारला. मागील दरवाजाने घरात घुसलेला चोरटा दोन खोल्यांमध्ये फेरफटका मारून तिसरा मोबाईल उचलत असताना विद्यार्थिनींना जाग आली. त्यामुळे तो तिथेच टाकून दोन मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वैभववाडी माईणकरवाडी येथील अवधूत माईणकर यांच्या रस्त्यालगतच्या घरात विद्यार्थिनी भाड्याने राहतात. रविवार असल्याने दोन्ही खोल्यांचे पुढचे दरवाजे बंद करुन त्या आपापल्या खोलीत झोपल्या होत्या. दुपारी २.४५ च्या सुमारास चोरटा मागील दरवाजाने घरात घुसला. एका खोलीतून फिरून दुसऱ्या खोलीतील मोबाईल उचलत असताना विद्यार्थिनींना जाग आली त्यामुळे तो मोबाईल तेथेच टाकून चोरटा पसार झाला.

दरम्यान, खिडकीवर ठेवलेले दोन मोबाईल त्याने लंपास केले. चोरटा पायातील स्लीपर तेथेच टाकून गेला. चोरट्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट होता. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटा पळालेल्या दिशेने पोलीस गेले असता सुकनदीत आंघोळ करणाऱ्या मुलांनी अनोळखी व्यक्ती नदीतून उतरून पलीकडे एडगावच हद्दीत गेल्याचे पोलिसांना सांगितले.

भरवस्तीत रहदारीच्या मार्गालगत दुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात होमगार्ड्सचा पहारा लावला आहे. या घटनेमुळे शहरातील अंतर्गत मार्गावरही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद झालेला नाही.

Web Title: Dallas on mobiles in Vaibhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.