संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुणकेश्वरचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:40 IST2025-02-27T17:40:16+5:302025-02-27T17:40:34+5:30
कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य

संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुणकेश्वरचे घेतले दर्शन
देवगड : महाशिवरात्रीचा उत्साह बुधवारपासून संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चा करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्रे आहेत आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहूर्तावर यात्रा, पूजा होत असतात. सण आणि उत्सव ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार किरण सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, विलास साळसकर, अमोल लोके, संदीप साटम, सावी लोके, आदी उपस्थित होते.
कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य
यावेळी शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आणि नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. अशाच प्रकारचा द्रुतगती महामार्ग म्हणजेच सुपर एक्स्प्रेस वे मुंबई ते सिंधुदुर्ग आपण करतो आहोत; त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनवाढीसाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाला चालना दिली तर तरुणांना जिल्ह्यातच काम मिळेल, असेही ते म्हणाले.