नगरसेवक गेले शिवसेनेत; फटाके फोडले भाजपने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:10 IST2021-02-10T17:08:08+5:302021-02-10T17:10:00+5:30
Bjp Shivsena Sindhudurg- वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

भाजप कार्यकर्त्यांनी वैभववाडी येथील संभाजी चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर त्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही फटाक्यांची आतषबाजी केली. दोन्ही पक्षांनी फटाके वाजविल्यामुळे काही काळ शहरवासीय संभ्रमात पडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ६ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या काही मिनिटे अगोदर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यालयातून जोरदार घोषणाबाजी करीत संभाजी चौकात पोहोचले. तेथे त्यांनी भाजपचा विजय असो; उडाले ते कावळे, राहिले ते मावळे; नीतेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, भारती रावराणे, हुसेन लांजेकर आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांना ते सहाही नगरसेवक नकोसे झाले होते. त्यामुळे स्वत:हून पक्षातून गेले ते बरे झाले. ते गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. ते गेल्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नसून येत्या नगरपंचायत निवडणुकीत १७ ही नगरसेवक भाजपचेच निवडून येतील. जे पक्षातून गेले त्यांना आमदार नीतेश राणेंनी निवडून आणले होते. त्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली. ते गेल्यामुळेच आम्ही आनंदोत्सव साजरा केला, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.
फटाक्यांबाबत शहरात चर्चा
सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौकातच फटाक्यांची आतषबाजी करीत पक्षप्रवेशाचे स्वागत केले. परंतु दोनदा फटाके फुटल्यामुळे लोकांना मात्र नेमके कोणी, कशासाठी फटाके वाजवले, हे कळलेच नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वाजविलेल्या फटाक्यांची मात्र चर्चा झाली.