CoronaVirus Lockdown: | CoronaVirus Lockdown : कणकवली शहरात राखीव पोलीस तैनात

कणकवली बाजारपेठेत फेरफटका मारत जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,निरीक्षक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देकडक संचारबंदी ! बॅरिकेट्स लावून अंतर्गत रस्ते रोखले पोलीस अधिकाऱ्यांसह राखीव पोलीस तैनात

कणकवली : संचारबंदीचे नियम कडक आणि काटेकोर करूनही जनतेकडून त्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कणकवली शहरात आणि बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दररोज येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लाथाडून बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यात येत होती. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळ पासून कणकवलीत संचारबंदी कडक केली. 

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी पोलिसांनी अनेक वेळा बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या बाबतीत लवचिक धोरण स्विकारले. मात्र, त्याचा अनेक गैरफायदा घेतला जाऊ लागला. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण वाढू लागले .

ही गर्दी फक्त कणकवली पुरती मर्यादित न रहाता इतरही बाजारपेठांमध्ये पहायला मिळू लागली. तसेच काही दुचाकी चालक विनाकारण फेरफटका मारतानाही पोलिसांनी पकडले . नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून दुचाकी शहरात कुठेही फिरवल्या जाऊ नये, लोकांचे विनाकारण फेरफटके बंद व्हावे, यासाठी नाकाबंदीचे आदेश दिले.

त्याची अंमलबजावणी कणकवलीत मंगळवारी सायंकाळ पासूनच करण्यात आली. बुधवारी सकाळपासून तर संचारबंदी आणखीनच कडक करण्यात आली. स्थानिक पोलिसांसह राखीव पोलीस फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौक ते बाजारपेठ, नागवे रोड, डीपीरोड, नरडवे रोड ते रेल्वे स्टेशन व अन्य भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे गर्दीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक नागरिकानी घरीच राहणे पसंत केले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट !

संचारबंदीबाबत पहाणी करण्यासाठी बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी कणकवलीला भेट दिली. बाजारपेठेत फेरफटका मारत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत व्यापारी व नागरीकाना सूचना केल्या.


 

Web Title: CoronaVirus Lockdown:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.