corona virus : खासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 14:42 IST2020-09-04T14:40:27+5:302020-09-04T14:42:14+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

मुंबई मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मुंबई येथे मंत्रालयातून पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड १९ बाबत इतर विविध प्रश्नांसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर सहभागी झाले होते. याबैठकीत कोविड१९ बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.
हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना
गोव्यात नोकरीनिमित्त दररोज ये जा करणाऱ्या व्यक्तींना कोविड टेस्ट किंवा क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नाही. त्यांची थर्मल स्कॅनिंग करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील वाळू लिलाव लवकरात लवकर करण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना बैठकित देण्यात आल्या आहेत.