एक ठेकेदार काळ्या यादीत दोघांचे ठेके काढून घेतले

By Admin | Updated: December 26, 2014 23:59 IST2014-12-26T21:55:17+5:302014-12-26T23:59:19+5:30

आंबोली तलावाचे काम : सावंतवाडी पंचायत समिती विकास सभा

A contractor removed the contract for both the black list | एक ठेकेदार काळ्या यादीत दोघांचे ठेके काढून घेतले

एक ठेकेदार काळ्या यादीत दोघांचे ठेके काढून घेतले

सावंतवाडी : लघू पाटबंधारेच्या आंबोली तलावाचे काम वेळेत पूर्ण झाल्याचा ठपका ठेवत एका ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तर उर्वरित दोन ठेकेदाराचे ठेके काढून घेण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या विकास समिती सभेत लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावर सभापती प्रमोद सावंत यांनी पुढचे काम कसे करणार, याबाबत विचारले असता, अधिकाऱ्यांनी नव्याने निविदा काढणार असल्याचे स्पष्ट केले.
सावंतवाडी पंचायत समितीची विकास समिती सभा शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापती प्रमोद सावंत, गटविकास अधिकारी शरद महाजन, सदस्या श्वेता कोरगावकर, रो िहणी गावडे, वर्षा हरमलकर, विनायक दळवी आदींसह अधिकारी एस. एस. सावंत, व्ही.एन.ठाकूर, ए. टी. पाटील, पी. बी. शिंदे, जयंत महाले, एस. डी. करमलकर, ए. के. गावडे, आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.
आंबोली येथे लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तलावाचे काम सुरू आहे. वर्षानुवर्षे हे काम तसेच सुरू आहे. मात्र कामात प्रगती होत नाही. अखेर या कामाचे चार मक्ते काढण्यात आले होते. त्यात तीन ठेकेदार नेमण्यात आले होते. यात खाजणादेवी मजूर संस्था तसेच गुरूदत्त बिर्जे व धामापूरकर असे तीन ठेकेदार होते. यातील खाजणादेवी या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले असून अन्य दोन ठेकेदाराचे ठेके काढून घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी सभागृहाला दिली आहे.
पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर विशेष लक्ष द्यावे तसेच लसीकरण खरच होते काय हे तपासावे अशा सूचना सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिले. तसेच तालुक्यात १७२ शाळांना संरक्षक भिंतीची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले तर अंगणवाडी सेविकेची पाच पदे रिक्त असल्याचे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले असून तालुक्यात संगणक दुरूस्तीसाठी ४ लाखाची गरज असल्याची विनंती शिक्षणाधिकारी विठ्ठल देसाई यांनी सभापती यांच्याकडे केली.
यावेळी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने असनिये येथे पुलाचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने सभापती पेडणेकर यांनी बांधकामचे अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी हे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी सभापती पेडणेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत सर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: A contractor removed the contract for both the black list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.