सिंधुदुर्गात संततधार सुरूच

By Admin | Updated: July 14, 2014 23:35 IST2014-07-14T23:27:54+5:302014-07-14T23:35:13+5:30

वादळी वाऱ्यासह पावसाने लाखाची हानी

Continuous advance in Sindhudurg | सिंधुदुर्गात संततधार सुरूच

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार आज, सोमवारी सुरूच होती. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांची अंशत: हानी होऊन एक लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील साळशी येथील घराचा तसेच कुडाळ तालुक्यातील विविध घटनांचा समावेश आहे.
सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात ४६.४२ मि.मी.च्या सरासरीने ३७१.४० मि.मी. एवढा पाऊस झाला आहे, तर अद्यापपर्यंत जिल्ह्यात १०५३.३७ मि.मी.च्या सरासरीने ८४२७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
सिंधुदुर्गात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या आठ दिवसांत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने भातशेतीच्या कामांना वेग आला आहे, तर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गतवर्षी १४ जुलैपर्यंत एकूण सरासरी १९५७ मि.मी. एवढा पाऊस पडला होता. यावर्षी अद्यापही गतवर्षीपेक्षा सरासरी ९०० मि.मी. एवढा पाऊस कमी झाला आहे.
देवगड शहर व परिसर तसेच पूर्ण तालुक्यामध्ये आज तुफानी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. साळशी येथील चंद्रकांत सीताराम पोंभुर्लेकर यांच्या घरावर झाड कोसळून त्यांचे सुमारे ३८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची पंचयादी देवगड तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे नोंद करण्यात आली. ही घटना काल, रविवारी रात्री घडली.
देवगड, विजयदुर्गसह मिठबाव, तांबळडेग येथेही जोरदार वाऱ्यासह तुफानी पर्जन्यवृष्टी झाली. समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळत असल्याने सर्वत्र खबरदारीचा इशाराही देण्यात आला होता. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात सर्वत्र वीज व दूरध्वनी सेवा वारंवार विस्कळीत होत होती. कणकवली शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती.
कुडाळ तालुक्यातही पावसामुळे घरांच्या पडझडीच्या घटना घडल्याने सुमारे ७० हजारांचे नुकसान झाले आहे. पावशी येथील मोरी खचल्यामुळे कांता पावसकर यांच्या घरात पाणी शिरले. तसेच समाज मंदिराच्या कंपाऊंडची भिंत पडल्याने नुकसान झाले. कुडाळ औदुंबर नगरीतील जयवंती चव्हाण यांच्या घरावर संरक्षक भिंत कोसळल्याने घराच्या छपराचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. आंब्रड येथील नारायण राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने नुकसान झाले. तसेच भरणी येथील सत्यवान परब यांचा मांगर पडून सात हजार ७३० रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Continuous advance in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.