पवनचक्क्यांची उभारणी लवकरच
By Admin | Updated: July 18, 2014 23:15 IST2014-07-18T23:02:08+5:302014-07-18T23:15:33+5:30
दमदार संयंत्रे बसविली जाणार : वीज वितरण कंपनीची माहिती

पवनचक्क्यांची उभारणी लवकरच
देवगड : देवगडच्या जुन्या पवनचक्की प्रकल्पाच्या जागी आता आठ नवीन व अधिक दमदार संयंत्रे बसविली जाणार आहेत. त्यांच्या पायाभरणीचा भाग पूर्ण झाला असून सप्टेंबरअखेरीस नवीन पवनचक्क्यांची उभारणी सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.
देवगड तालुक्याची विजेची गरज ७ मेगावॅट आहे. नवीन पवनविद्युत प्रकल्पाद्वारे १० मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून उर्वरित ३ मेगावॅट वीज मुख्य ग्रीडला जोडली जाईल. प्रत्येक १२५० के. डब्ल्यू. क्षमतेची ८ संयंत्रे वर्षभरात कार्यान्वित होती, असा विश्वास कंत्राटदार सुझलॉन कंपनीने व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुका वीज क्षेत्रातील स्वयंपूर्ण तालुका म्हणून अग्रेसर राहील. सुझलॉन कंपनीच्या पवनचक्की संयंत्राचा मॉडेल क्र. एस ६६ आहे. प्रत्येक संयंत्राची वीजनिर्मिती क्षमता १२५० के. डब्ल्यू. इतकी आहे. पवनचक्कीच्या मूळ टॉवरची उंची ७४.५ मीटर इतकी आहे. रोटर डायमीटर ६६ मीटर इतका आहे. कट इन बिंड स्पीड ४ मीटर सेकंद इतका आहे. अधिकतम स्पीड २० मीटर सेकंद इतका आहे. या पवनचक्कीचा रोटर ५२ मीटर सेकंद इतका वाऱ्याचा जोर सहन करू शकते. प्रत्येक पवनचक्कीला ३ ब्लेड्स असतील. टॉवरचे वजन ९४७५० किलो तर ३ ब्लेड्सचे वजन ९९९० किलो इतके आहे. प्रत्येक पवनचक्कीचे एकूण वजन १,६३,०४० किलो इतके भरेल.
या प्रकल्पातील वीज स्वतंत्रपणे ३३ केव्ही लाईन यंत्रणेद्वारे मूळ यंत्रणेशी जोडली जाईल व वीज पुरवली व साठवली जाईल. मूळ प्रकल्पातील जुनी व कालबाह्य संयंत्रे जानेवारीमध्ये स्क्रॅप करून काढून नेण्यात आली. फाऊंडेशनचे काम मार्चपूर्वी सुरू होऊन जूनमध्ये पूर्ण करण्यात आले.
या संयंत्राद्वारे प्रत्येकी १९.७७ लाख युनिट्स डब्ल्यूइजी इतकी वीजनिर्मिती होईल. यातून निर्माण झालेली वीज जामसंडे येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये जोडली जाईल. ९५ टक्के क्षमतेची खात्री देऊन वीजनिर्मिती होईल, असे सुझलॉन कंपनीने लिखित स्वरूपात मान्य केले आहे. या सर्व प्रकल्पांतर्गत सुझलॉन कंपनीने अप्रोच रोडमध्ये सुधार किंवा बदल अंतर्गत रस्ते वाहतूक व्यवस्था निर्मिती, टॉवर फाऊंडेशन निर्मिती, टॉवर उभारणे, बांधणी व सुरूवात करून वीज निर्मितीही सुरू करायची आहे. यामध्ये या सर्व ८ संयंत्रांद्वारे १० मेगावॅट वीज निर्मितीची खात्री द्यायची आहे. अंतर्गत ३३ केव्ही वीजवाहिन्या देण्याचेही मान्य केले आहे. या सर्व प्रकल्पाची देखरेख व देखभाल पुढील १० वर्षे सुझलॉनची जबाबदारी राहणार आहे. तर सर्व सरकारी परवानग्या, मुख्य रस्त्यापासून साईटपर्यंत वाहतूक व्यवस्था, साईट बाहेरील ३३ केव्ही विद्युतवाहिन्या उभारणी व जामसंडे सबस्टेशनपर्यंतची वीज वाहतूक तसेच वीजनिर्मिती व साठवणूक परवाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची जबाबदारी राहील हे कंत्राट करारात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ७० ते ८० कोटी रूपयांच्या अंदाजित व सुधारीत खर्च अंदाजाच्या या प्रकल्पाने महाराष्ट्रातील एक वीज निर्मितीतील स्वयंपूर्ण तालुका म्हणून देवगडचे नाव अग्रेसर राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)