काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 09:18 PM2017-11-09T21:18:10+5:302017-11-09T21:18:24+5:30

कणकवली : नोटाबंदी म्हणजे चलनशुद्धी असून हा मूळचा गांधी विचार आहे. महात्मा गांधीजींचे सहकारी विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चिंतनातून चलनशुद्धी हा विचार पुढे आला.

The Congress criticized the Gandhi ideology and criticized the movement and Pramod Jathar | काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका

काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका

Next

कणकवली : नोटाबंदी म्हणजे चलनशुद्धी असून हा मूळचा गांधी विचार आहे. महात्मा गांधीजींचे सहकारी विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चिंतनातून चलनशुद्धी हा विचार पुढे आला. 1956 रोजी अप्पासाहेब पटवर्धनांनी हा विचार मांडला. मात्र, काँग्रेसला आता गांधी विचारांचा विसर पडला आहे. त्यांनी गेली 60 वर्षे बेनामी संपत्ती निर्माण केली असून, आता त्याला सुरुंग लागला असल्याने काँग्रेसने आक्रोश आंदोलन सुरू केले आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.

येथील भाजप संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, शिशिर परूळेकर , बबलू सावंत उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार म्हणाले, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करून कठोर पावले उचलली. त्यामुळे यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी आम्ही काळा पैसा विरोधी दिन साजरा केला.

कासार्डे येथे कणकवली विधानसभा मतदारसंघाचा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी 350 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अतुल काळसेकर, संदेश पारकर, राजन तेली तसेच अन्य प्रमुख पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. नोटाबंदीच्या नावाने गळा काढणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी अप्पासाहेब पटवर्धनांचे चरित्र वाचावे. त्यामुळे त्यांना नोटाबंदी हा गांधी विचार होता हे समजेल. आतापर्यंत काळ्या पैशाची दिवाळी करणाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली आहे. मात्र, या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारत आर्थिक महासत्ता बनेल. यापुढे आता बेनामी संपत्ती बाहेर काढण्याची लढाई आम्ही सुरू करणार आहोत.

गांधी विचार काँग्रेसला पेलवत नसल्याने नरेंद्र मोदी यांनी त्याची आठवण त्यांना करून दिली. नोटाबंदीमुळे सामान्य करदाता खूश आहे. जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाकडे कराच्या माध्यमातून पैसा उपलब्ध होईल. हा निर्णय धारिष्ठ्याचा होता. तसेच आव्हानात्मक होता. सामान्य कुवतीचा तसेच दुर्बळ मनाचा पंतप्रधान हा निर्णय घेऊ शकत नव्हता. तो निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हा निर्णय अजूनही हजम होत नाही.

कणकवली तालुक्यातील गोपुरी येथे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा हा विचार देशभर पोहोचला याबाबत आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे 13 नोव्हेंबर रोजी अप्पासाहेबांचे आत्मचरित्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आम्ही भेट देणार आहोत, असेही जठार यावेळी म्हणाले. 11 नोव्हेंबर रोजी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा भाजपाचा मेळावा घेण्यात येणार आहे. तर त्यानंतर 50 जिल्हा परिषद गट व जिल्ह्यातील 8 शहरे असे 58 मेळावे होतील. आजच्या कासार्डे येथील मेळाव्यात बूथ प्रमुख अॅपचे उदघाट्न करण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रत्येक गावात जाऊन एक बूथ प्रमुख व 25 सदस्य अशा 26 जणांची यादी या अॅपवर लोड करणार असल्याचे प्रमोद जठार यानी सांगितले.

Web Title: The Congress criticized the Gandhi ideology and criticized the movement and Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.