मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुलीबाबत संभ्रम; ओसरगाव, राजापूर हातिवले टोलनाके उद्यापासून सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 20:34 IST2022-05-31T20:34:21+5:302022-05-31T20:34:53+5:30
याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुलीबाबत संभ्रम; ओसरगाव, राजापूर हातिवले टोलनाके उद्यापासून सुरू?
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील हातिवले येथील टोलनाके अखेर आजपासून (१ जून) सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. ओसरगावसोबत राजापूर-हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरू केला, तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश काम बाकी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले टोलनाका परिसरातील काम वगळता इतर बहुतांश काम अपुरे आहे. त्यामुळे तूर्तास टोल सुरू करू नये, यावरून राजकारणही तापले आहे. टोलनाका सुरू होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
भाजपने दिला टोलनाका फोडण्याचा इशारा
दरम्यान, भाजपाचे कणकवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत, टोलमधून एमएच ०७ म्हणजे सिंधुदुर्ग पासिंगमधील सर्व गाड्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, ही मागणी पूर्ण न केल्यास टोलनाका फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.