A collision between two trucks, near Kasarde-Jambulwadi | दोन ट्रकमध्ये भीषण धडक, कासार्डे-जांभुळवाडीजवळील घटना

कासार्डे जांभुळवाडीनजीक रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील बॉक्सवेल ब्रिजवर दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला.

ठळक मुद्देदोन ट्रकमध्ये भीषण धडक, कासार्डे-जांभुळवाडीजवळील घटनामहामार्गावर वाहतूक ठप्प; सुदैवाने जीवितहानी नाही

तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभुळवाडीनजीक असलेल्या रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील नवीन बॉक्सवेल ब्रिजवर मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघाताची भीषणता भयानक होती.

सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडला. यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पर्यायी मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

गोव्यावरून आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक लोखंडी सामान भरून पुण्याच्या दिशेने जाणारे चालक प्रकाश परमेश्वर घुले (२५, रा. डोळेवाडी, राजुरी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) व क्लिनर महेश बाबू तोडेकर (२१, रा. मेंगडेवाडी, ता. जि. बीड) हे कासार्डे जांभुळवाडीनजीकच्या रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील बॉक्सवेल ब्रिजवर पहाटे साडेपाचच्या दरम्यान आले आले.

त्याचवेळी सांगलीवरून आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रकमध्ये कोंबडीचे खाद्य घेऊन कुडाळच्या दिशेने जाणारे चालक समीर गौस सय्यद (३९, रा. मिरज, बुधवारपेठ, जि. सांगली) हेही आले असता दोन्ही चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने दोन्ही मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात घडला.

या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच कासार्डे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार नितीन खाडे यांनी धाव घेत स्थानिक ग्रामस्थ व महामार्ग चौपदरीकरण करणारी केसीसी कंपनीचे कर्मचारी घेत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत गंभीर दुखापत नसल्याने किरकोळ दुखापत झालेल्या चालक व क्लिनर यांना जागेवरच रुग्णवाहिका
बोलावून प्राथमिक उपचार करण्यात आले.

मात्र, तीन वाहने जातील असा मार्ग असताना नेमका अपघात कसा घडला याबाबत चर्चा केली जात असून दुसºया वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अथवा एखादे वाहन थांबले असता बाजू देताना दोन्ही ट्रकचालकांचा वाहनांवरील ताबा सुटला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मात्र नेमका अपघात कसा घडला हे सांगणे कठीण आहे. या अपघातानंतर काहींनी चोरीचाही प्रयत्न केला. मात्र नागरिक व पोलीस नितीन खाडे हे घटनास्थळी दाखल होताच ते पसार झाले. या अपघाताची नोंद झाली नव्हती.
यानंतर महामार्ग चौपदरीकरण करणाºया केसीसी कंपनीच्या हायड्रा या मशीन व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने तब्बल चार तासांनंतर बाजूला करीत वाहतूक मूळ मार्गावरून पूर्ववत करण्यात आली.

दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

या अपघाताची भीषणता एवढी होती की कुडाळच्या दिशेने जाणारा ट्रक अपघातानंतर दुसºया ट्रकच्या बाजूला म्हणजेच तळेरेच्या दिशेने तोंड करून उभा होता. अपघाताची भीषणता पाहता मोठी गंभीर दुखापत झाली असे दृश्य दिसत होते. मात्र, दोन वाहनांतील चालक व क्लिनर यांना किरकोळ डोक्याला, पायाला व मुका मार लागला होता. सांगलीवरून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची पुढील दोन्ही चाके तुटल्याने पुढील टायर वेगळे झाले होते. तर दोन्ही ट्रकचा समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.


 

Web Title: A collision between two trucks, near Kasarde-Jambulwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.