Sindhudurg: मृत डॉल्फिनला सहकाऱ्यांनी पाठीवरून नेले, 'आँखो देखी'ने पर्यटकांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:47 IST2025-12-18T13:43:41+5:302025-12-18T13:47:20+5:30
निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो; तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो. याचा प्रत्यय तळाशीलच्या समुद्रात आला

Sindhudurg: मृत डॉल्फिनला सहकाऱ्यांनी पाठीवरून नेले, 'आँखो देखी'ने पर्यटकांचे डोळे पाणावले
मालवण : निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो; तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो. याचा प्रत्यय मंगळवारी (दि. १६) तळाशीलच्या समुद्रात आला. एका मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिनला वाचविण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली धडपड आणि एका मोठ्या डॉल्फिनने त्याला आपल्या पाठीवर घेत दिलेला अखेरचा आधार पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले.
तळाशील येथील समुद्रात मंगळवारी एक छोटा डॉल्फिन मृतावस्थेत तरंगताना आढळला. सहसा अशा वेळी कळपातील इतर जीव पुढे निघून जातात; पण येथे चित्र वेगळे होते. आपल्या छोट्या सोबत्याचा मृत्यू झाला आहे हे कळताच इतर डॉल्फिननी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्या मृत पिलाला पाण्यात उलट-सुलट करून त्याला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.
जेव्हा सर्व प्रयत्न थकले, तेव्हा एका मोठ्या डॉल्फिनने त्या मृत पिल्लाला आपल्या पाठीवर घेतले आणि तो त्याला लाटांमधून पुढे नेऊ लागला. हे दृश्य एखाद्या मानवी अंत्ययात्रेसारखेच भावुक होते. तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या होडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी हा दुर्मीळ आणि हृदयस्पर्शी प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
निसर्गातील हे नाते, प्रेम पाहून डोळे पाणावले
प्राण्यांनाही भावना असतात आणि तेही आपल्या आप्तांच्या मृत्यूने व्याकुळ होतात, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले. डॉल्फिनची ही धडपड पाहून होडीतील पर्यटकही काही काळ स्तब्ध झाले होते. निसर्गातील हे नाते आणि प्रेम पाहून प्रत्येकजण गहिवरून गेला होता. डॉल्फिनमधील ही संवेदनशीलता आपण प्रथमच इतक्या जवळून पाहिली, असे प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी सांगितले.