निर्णय होईपर्यंत शाळा ठेवणार बंद

By Admin | Updated: July 14, 2014 23:36 IST2014-07-14T23:26:21+5:302014-07-14T23:36:13+5:30

शिक्षक प्रश्नी वागदे ग्रामस्थ आक्रमक

Closing the school until the decision | निर्णय होईपर्यंत शाळा ठेवणार बंद

निर्णय होईपर्यंत शाळा ठेवणार बंद

कणकवली : वागदे देऊळवाडी शाळा क्र. ४ मधील शिक्षिका तसेच शाळा क्र. १ च्या मुख्याध्यापकांचे काम समाधानकारक नाही, असा आरोप करीत वागदे ग्रामस्थ सोमवारी आक्रमक झाले. येथील पंचायत समिती कार्यालयावर धडक देत गटशिक्षणाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, जोपर्यंत देऊळवाडी येथील शाळेतील शिक्षिकेची बदली करण्यात येत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
वागदे देऊळवाडी शाळा क्र. ४ मधील शिक्षिका शाळेच्या वेळेत उपस्थित नसतात. तसेच कार्यालयीन कामासाठी जात आहे असे सांगून शाळेतून बाहेर पडतात आणि दुसऱ्या दिवशीच शाळेत येतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विचारणा केल्यास पालकांना या शिक्षिकेकडून उलटसुलट उत्तरे देण्यात येत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीनेही याबाबत त्यांना विचारणा केली आहे. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. यापूर्वीही या शिक्षिकेची बदली करण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने पुन्हा एकदा सोमवारी गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे यांची भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संदेश किंजवडेकर उपस्थित होते.
मात्र देऊळवाडी शाळेतील शिक्षिकेबाबत काहीच निर्णय न झाल्याने सोमवारी पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेले. तसेच या शिक्षिकेबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या पाचही शाळांमध्ये मुलांना पाठविणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सरपंच संदीप सावंत यांनी दिली.
वागदे शाळा नं. १ मधील मुख्याध्यापक ग्रामस्थांना आवश्यक दाखले द्यायला टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, किशोर घाडीगावकर, गोविंद घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, भाई घाडीगावकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयात उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सभापती मैथिली तेली, सदस्य महेश गुरव यांचेही या शिक्षकांविषयीच्या समस्यांबाबत लक्ष वेधण्यात आले. त्यांनी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Closing the school until the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.