देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉलधारकांमध्ये हाणामारी, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 11, 2024 18:19 IST2024-05-11T18:18:50+5:302024-05-11T18:19:29+5:30
देवगड पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी

देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉलधारकांमध्ये हाणामारी, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉलधारकांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती कृष्णा घाडी (२५, सध्या राहणार पवनचक्की देवगड मूळ राहणार डोंबिवली मुंबई) हिने दिलेल्या तक्रारीमध्ये शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पवनचक्की येथील सत्यवान जोईल यांच्या मालकीच्या वडापावच्या स्टॉलवर नाश्त्याचे पदार्थ बनवित होता. या स्टॉलच्या शेजारी बाजूस असलेल्या पाणीपुरी स्टॉलधारक शैलेश भुजबळ याने माझा आते भाऊ सनीत सत्यवान जोईल यास बोलावून घेऊन ‘तू लय शहाणा झालायस काय’ असे विचारून त्याला मारण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्या मारहाणीचे शूटिंग करत असताना सुप्रिया भुजबळ व शीतल जोईल यांनी माझ्या अंगावर धाव घेऊन मला मारण्यास सुरुवात केली. तसेच शैलेश भुजबळ याने सनीत यास लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याचबरोबर शैलेश भुजबळ याच्यासमवेत असलेले मंजी काका व हेमंत जोईल यांनी माझी आत्या स्मिता सत्यवान जोईल, काका सत्यवान वसंत जोईल व आत्ते भाऊ सनीत जोईल यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सुप्रिया भुजबळ, शीतल जोईल, शैलेश भुजबळ, मंजी काका, हेमंत जोईल या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर ईश्वरी शैलेश भुजबळ हिने दिलेल्या तक्रारीमध्ये १० मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता आपल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर असलेले सासरे मंजिनाथ वसंत भुजबळ यांना सनीत सत्यवान जाईल यांनी शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करायला गेल्यावर त्याने मलाही शिवीगाळ केली. यावेळी आपले पती शैलेश भुजबळ हे आले असता त्यांनाही शिवीगाळ करून सनीत सत्यवान जोईल, सत्यवान वसंत जोईल, रज्जा अंकुश चव्हाण या तिघांनी मारहाण करून दुखापत केली. त्याचबरोबर कीर्ती कृष्णा घाडी व स्मिता सत्यवान जोईल यांनीही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सनीत सत्यवान जाईल, सत्यवान वसंत जोईन, कीर्ती कृष्णा घाडी, स्मिता सत्यवान जोईल व रज्जा अंकुश चव्हाण या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.