वेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव, कारभारावर नागरिकांचा निषेध; मुख्याधिकाऱ्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:37 IST2025-05-17T16:36:12+5:302025-05-17T16:37:36+5:30

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील दोन चार राजकारणी आणि निवडक कंत्राटदार लॉबीतील लोकांच्या हाताखाली त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार हाकत असल्याचे ...

Citizens protest against the administration of Vengurla Municipal Council | वेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव, कारभारावर नागरिकांचा निषेध; मुख्याधिकाऱ्यांना दिला इशारा

वेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव, कारभारावर नागरिकांचा निषेध; मुख्याधिकाऱ्यांना दिला इशारा

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील दोन चार राजकारणी आणि निवडक कंत्राटदार लॉबीतील लोकांच्या हाताखाली त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून, त्याचा आम्ही निषेध करतो. नगरपरिषदेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावे, अशी मागणी वेंगुर्ल्यातील सजग नागरिकांनी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडे केली आहे.

 ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. मनीष सातार्डेकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर व अवधूत वेंगुर्लेकर यांनी मुख्याधिकारी किरूळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले की, गेली अडीच ते तीन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकांच्या नेतृत्वाखाली हाकला जात आहे.
लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी व वेंगुर्ल्यातील मोजक्या राजकारण्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पालिकेचा कारभार हाताळला आहे. शहरातील सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांना कधीच आदराने पाचारण केले जात नाही, ही बाबही अतिशय खेदजनक आहे. या प्रकारचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

कोकण आयुक्तांकडे रितसर तक्रार करणार

केवळ चार-पाच व्यक्ती म्हणजे संपूर्ण शहर असूच शकत नाही. याची साधी जाणीव पालिकेला नाही. विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत यापूर्वीच्या आढावा बैठकीत फक्त राजकीय पक्ष प्रतिनिधी व निवडक कंत्राटदार लॉबी यांना बोलावून सामान्य नागरिकांची गळचेपी केली आहे, असे शहरवासीयांच्या दृष्टिक्षेपात आलेले आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, कोकण भवन बेलापूर यांच्याकडे आपली रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी मुख्याधिकारी यांना दिला.

Web Title: Citizens protest against the administration of Vengurla Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.