चिपी विमानतळ राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:24 IST2018-08-11T14:20:18+5:302018-08-11T14:24:13+5:30
चिपी विमानतळ हा नारायण राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाहणी करत आहोत. खासदार विनायक राऊत यांनी १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याची घोषणा केली असली तरी आपण राजकीय आरोप प्रत्यारोप न करता राणे आदेश देतील त्यानुसार आम्ही भूमिका जाहीर करू, असे सूचक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.

चिपी विमानतळ येथील प्रवासी टर्मिनलची पाहणी आमदार नीतेश राणे यांनी केली.
मालवण : चिपी विमानतळ हा नारायण राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाहणी करत आहोत. खासदार विनायक राऊत यांनी १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याची घोषणा केली असली तरी आपण राजकीय आरोप प्रत्यारोप न करता राणे आदेश देतील त्यानुसार आम्ही भूमिका जाहीर करू, असे सूचक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.
चिपी विमानतळावरून १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याचे सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केले होते. त्यामुळे या विमानतळाच्या कामाची माहिती घेण्यासाठी आमदार नीतेश राणेंनी शुक्रवारी चिपी येथे जाऊन विमानतळ कामाची पाहणी केली. अधिकारी लोणकर यांनी आमदार नीतेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मंदार केणी, मनीष दळवी, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळाचा आराखडा दाखवत छोटी विमाने या विमानतळावर उतरणार असल्याचे सांगितले. जी धावपट्टी कमी केलेली आहे, ती केव्हाही वाढवता येणार असल्याचे अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. यानंतर नीतेश राणेंनी धावपट्टी, पॅसेंजर टर्मिनल यासह इतर कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विमानतळ हा राणे साहेबांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.