सिंधुदुर्गात बसपा स्वबळावर लढणार, इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:16 IST2019-09-14T13:14:18+5:302019-09-14T13:16:14+5:30
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात बसपा स्वबळावर लढणार, इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती
मालवण : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आॅक्टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीची राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत केंद्रीय महासचिव राज्याचे प्रमुख प्रभारी आमदार रामअचल राजभर, राज्यप्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
बहुजन समाज पार्टी देशातील तीन नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. आज या पक्षाचे लोकसभेत १० खासदार तर राज्यसभेत ५ खासदार आहेत. देशातील सर्व राज्यात पक्ष कार्यरत आहे. तरीही राज्यातील आंबेडकरवादी समविचारी पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढविण्याचे या बैठकीत जाहीर केले.
बसपा सिंधुदुर्गची बैठक नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर, रवींद्र कसालकर, अध्यक्ष दीपक जाधव, एस. एस. विणकर, जिल्हा महासचिव विजय साळकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आले.
मुंबई, कोकण विभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बसपाचे नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांनी दिली.