Sindhudurg: ..अखेर खारेपाटणमध्ये नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2025 16:44 IST2025-02-28T16:43:08+5:302025-02-28T16:44:20+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे शुकनदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनी सापडला. कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर ...

Sindhudurg: ..अखेर खारेपाटणमध्ये नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
संतोष पाटणकर
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे शुकनदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनी सापडला. कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर प्रकाश वाळके (वय २९) हा बुधवारी (दि.२६) नदी पात्रात बुडालेला होता. आज, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता वाळके यांचा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली.
मृत दिगंबर वाळके हा आपल्या मित्रासोबत खारेपाटण शुकनदी येथे बुधवारी सायंकाळी आला होता. नदीत आंघोळ करण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याचा ठेकेदार मित्र राहुल महादेव वाघ (रा. कर्जत, अहमदनगर) यांनी पोलिसांनी दिली होती. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने गेले दोन दिवस नदीत शोध मोहीम राबविण्यात आली होती. अखेर आज त्याचा मृतदेह सापडला.
दरम्यान, शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्पीड बोटचा वापर करून नदी पात्र शोधून काढले. तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हींगचे पथकदेखील गुरूवारी सायंकाळी खारेपाटण आले होते. यामध्ये वैभव खोबरेकर, नुपूर तारी, सूजित मोंडकर, स्वप्नील धुरी, समीर गावकर यांचा समावेश होता. तरीही मृतदेह हाती लागला नाही.
आज, शुक्रवारी ८.३० च्या दरम्यान नदीपात्रात कोंडवाडी धारणाजवळ मृतदेह आढळून आला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत आधिक तपास खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे अधिकारी चंद्रकांत माने व मोहिते करीत आहेत.