Sindhudurg: वेंगुर्ला येथील समुद्रात होडी बुडाली, चार जण बेपत्ता; तिघे जण बचावले, शोधकार्य सुरू 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 24, 2024 11:49 IST2024-05-24T11:49:33+5:302024-05-24T11:49:59+5:30

पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू..

Boat sinks in sea at Vengurla, four missing; Three people survived | Sindhudurg: वेंगुर्ला येथील समुद्रात होडी बुडाली, चार जण बेपत्ता; तिघे जण बचावले, शोधकार्य सुरू 

संग्रहित छाया

प्रथमेश गुरव

वेंगुर्ला : येथील बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली होडी उलटली. यात ४ खलाशी बेपत्ता झाले असून तिघांनी पोहून किनारा गाठला. ही घटना काल, गुरुवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास घडली. ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातील १ खलाशी रत्नागिरीतील तर ३ खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासन व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे जीवाची परवा न करता पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र चार खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील तर तीन खलाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे समोर येत आहे. 

तत्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत बुडालेली होडी आणि चारही खलाशांचा पत्ता लागलेला नाही. पोलिस आणि स्थानिक मच्छीमार अजूनही शोध कार्य करत आहेत.

Web Title: Boat sinks in sea at Vengurla, four missing; Three people survived