बॉम्बे रक्तगटाचा रक्तदाता ठरला महिला रुग्णासाठी देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:33 IST2021-06-24T18:31:28+5:302021-06-24T18:33:00+5:30
Blood Sindhudurg : गतवर्षी विशाखापट्टणम् येथील बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या मालवण येथील पंकज गावडे या युवकाने आणखी एका महिलेचे रक्तदान करून प्राण वाचविले. हिवाळे (ता. मालवण) येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिलेला अतिदुर्मीळ अशा बॉम्बे रक्तगटाची गरज असल्याचे समजताच पंकज याने तातडीने पडवेतील लाईफटाईम रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले. बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मीळ रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.

पंकज गावडे याला डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र दिले.
मालवण : गतवर्षी विशाखापट्टणम् येथील बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या मालवण येथील पंकज गावडे या युवकाने आणखी एका महिलेचे रक्तदान करून प्राण वाचविले. हिवाळे (ता. मालवण) येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिलेला अतिदुर्मीळ अशा बॉम्बे रक्तगटाची गरज असल्याचे समजताच पंकज याने तातडीने पडवेतील लाईफटाईम रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले. बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मीळ रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.
लक्ष्मी गावडे यांना हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची गरज होती. त्यांची रक्तपेढीचे तंत्रज्ञ सुमित मुकादम, श्रध्दाली बिले, वरदा गाडगीळ यांनी रक्त नमुन्याची सखोल तपासणी केली असता, ही रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. यावेळी डॉ. बावणे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर आणि अमेय मडव यांच्या माध्यमातून रक्तदाते पंकज गावडे याच्याशी संपर्क केला.
पंकज हा तत्काळ सिंधु रक्तमित्रचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक यशवंत गावडे यांच्यासोबत रुग्णालयात पोहोचले. रक्ताच्या सर्व अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर पंकज गावडे यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले. त्यानंतर त्या रुग्णासह नातेवाईकांची सिंधु रक्तमित्रच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेऊन धीर दिला. यावेळी किशोर नाचणोलकर, डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. गोपाल, डॉ. आविष्कार, रक्तपेढी कर्मचारी आदी उपस्थित होते.
ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम् येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. जिल्ह्यामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रुग्णाला देण्यात आलेले हे पहिलेच रक्तदान आहे. त्यामुळे रुग्णाला कुठेही न हलवता किंवा रक्तदात्याला जिल्ह्याबाहेरून न आणता यशस्वीरित्या पंकज यांच्या रूपाने रक्तदान केले.