इंदू मिलचा प्रश्न भाजपने सोडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:34 IST2015-04-22T23:08:14+5:302015-04-23T00:34:04+5:30
भीमराव आंबेडकर : बौद्ध महासभेचे मुंबईत लवकरच देशव्यापी अधिवेशन

इंदू मिलचा प्रश्न भाजपने सोडविला
कुडाळ : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठीचा प्रश्न काँग्रेसच्या राज्यात सुटला नाही, तो भाजप सरकारने तत्काळ सोडवून मुंबई-इंदू मिल येथे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.
समाज बांधवांचे धार्मिक, सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता येत्या १६ व १७ मे रोजी भारतीय बौद्ध महासभेचे देशव्यापी अधिवेशन मुंबईत होणार असून, यापुढे संस्थेच्यावतीने राजकीय क्षेत्रातही बांधवांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील बाव व घावनळे येथील गावांमध्ये खासगी कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर यांनी १६ व १७ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या देशव्यापी महाअधिवेशनाबाबत येथील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी आंबेडकर म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा मुंबईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्दे, प्रभाकर जाधव, विलास वळंजू, महेश परूळेकर, व्ही. डी. जाधव, सोमा कुडाळकर, आर. डी. कदम, महेंद्र कदम, आनंद कासार्डेकर, पी. डी. माणगावकर, जनीकुमार कांबळे, चंद्रकांत कदम, सुदीप कांबळे,
वि.रा. आसुलकर आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांच्या स्मारकाची सर्वांचीच इच्छा पूर्ण
बाबासाहेबांचे मुंबईत मोठे स्मारक व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. चैत्यभूमी येथील जागेत मोठे स्मारक होऊ शकत नाही. त्यामुळे इंदू मिलची जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु काँग्रेस सरकारच्या काळात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले हे स्मारक सध्याच्या सरकारने तत्काळ मंजूर केले. याचा आनंद आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर म्हणाले.
जग जसजसे प्रगत होत आहे, तसतसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व वाढत असून मानवता आणि आदर्श समाज घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना वेगळा सन्मान आहे. भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल.
- भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा