२५ हजार हेक्टरवर भातपीक लावणी
By Admin | Updated: July 14, 2014 23:34 IST2014-07-14T23:28:45+5:302014-07-14T23:34:36+5:30
४0 टक्के काम पूर्ण : अरूण नातू यांनी दिली माहिती

२५ हजार हेक्टरवर भातपीक लावणी
सिंधुदुर्गनगरी : गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भातलावणीचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ६० टक्के भात लावणीचे काम जुलैअखेर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यावर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावणी होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागातील कृषीतंत्र अधिकारी-सांख्यिकी अरुण नातू यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टरी क्षेत्र भात लागवडीखाली येण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५९९८ हेक्टर क्षेत्रात भात पेरणी करण्यात आली आहे. अजूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तर उर्वरित ३५ हजार हेक्टर क्षेत्र जुलैच्या महिनाअरेख पूर्ण होईल अशी अपेक्षाही कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भात लावणीचे काम होऊन उर्वरित राहिलेल्या क्षेत्रात भात पेरणी (रहू) व नागली अशी पिके घेतली जाणार आहेत. आतापर्यंत ९९ हेक्टर क्षेत्रावर नागली पीक घेण्यात आले आहे. या व्यतिरिक्त नाचणी, भुईमूग, कुळीथ आदी पिके घेण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला होता. त्यानंतर ४ जुलैपासून पावसाने नॉनस्टॉप सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांनाही जोरदार सुरुवात केली आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार हेक्टर क्षेत्रात भातपीक लावणी पूर्ण झाली आहे तर उर्वरित लावणीही जुलैअखेर होणार आहे. ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलावणी होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यातच भात लावणी करून ४ ते ५ हेक्टर जागा पड रहात असेल तर त्याठिकाणी रहू पेरणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)