बार्जेस मच्छिमारांनी हुसकावल्या
By Admin | Updated: December 28, 2014 00:12 IST2014-12-28T00:06:25+5:302014-12-28T00:12:40+5:30
आरोंदा तेरेखोल खाडीतील प्रकार : मच्छिमार, कर्मचाऱ्यांत उडाली शाब्दीक चकमक

बार्जेस मच्छिमारांनी हुसकावल्या
आरोंदा : सध्या गाजत असलेल्या आरोंदा बंदराबाबतचा वाद शनिवारी पुन्हा उफाळून आला. आरोंदा बंदरावर लावण्यासाठी दोन बार्ज दुपारच्या सुमारास गोवामार्गे आरोंदा तरेखोल खाडीत दाखल झाल्या होत्या. मात्र, स्थानिक मच्छीमारांशी या बार्जेसमधून आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर मच्छीमारांनी या बार्जेस हुसकावून लावल्या. या दोन्ही बार्ज गोव्याच्या दिशेने रवाना झाल्या.
याबाबत आरोंदा जेटी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी या बार्जेस विनापरवाना आल्या होत्या. या बार्जेसमध्ये देशविघातक साहित्य असले तर त्यांची तपासणी कोण करणार, सागरी सुरक्षा दल नावाला असल्याचा आरोप केला आहे.
आरोंदा जेटीबाबतचा वाद सध्या गाजत आहे. त्यातच शुक्रवारी पालकमंत्री दीपक केसरकर यानी आरोंदा जेटीला भेट देत ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून घेतले तसेच याबाबतचा अहवाल मागवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीला चोवीस तासही उलटत नाही तोच शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गोवामार्गे दोन बार्जेस आरोंदा बंदर परिसरात आल्या. यावेळी मच्छीमारांनी या बार्जेसबाबत माहिती घेतली. यावेळी केरी तसेच आरोंदा येथील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
यावेळी बार्जेसमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना जेटीबाबतची कागदपत्रे विचारण्यात आली. मात्र, एकही कागदपत्र ते सादर करू शकले नाहीत. या बार्जेसमधील कर्मचारी गोव्याच्या भाषेत बोलत होते. त्यामुळे या बार्जेस गोवा वास्को येथून आल्या असाव्यात, अशी शंका मच्छीमारांनी व्यक्त केली मात्र, दुपारच्या सुमारास या बार्जेस समुद्रात लावण्यात आल्या. त्यावेळी त्यातील कोणतेही सामान बाहेर काढण्यात आले नाही.
या घटनेनंतर मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, सुधाकर नाईक, बाळा आरोंदेकर यांनी बंदर परिसराला भेट दिली. आणि मच्छीमारांकडून माहिती घेतली असता त्यांनी झालेला प्रकार कथन केला.
दरम्यान, अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी सागरी पोलीस तसेच कस्टम कार्यालयावर गंभीर आरोप केले असून जर समुद्रातून विनापरवाना एखादी बार्ज आली तर त्याची चौ कशी कशी काय करण्यात येत नाही. देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या बार्जेसमध्ये जर दहशतवादी कृत्ये करण्याचे सामान असेल तर काय करणार, असा सवाल उपस्थीत केला.
याबाबत आम्ही तक्रार करणार असून एकतरी पोलीस कायमस्वरूपी बंदर परिसरात ठेवण्यात यावा. कोण काय घेउन येत आहे, याची माहिती घ्यावी, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)